गणेश विसर्जनावेळी रात्री उशिरा १२ वाजेपर्यंत गणेश घाटावर
कुडाळ : कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर यांचे जनतेप्रती असलेले समर्पण, सेवा व बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली. आज गणेश विसर्जनावेळी कुडाळ येथे साकारण्यात आलेल्या नव्या गणेश घाटावर रात्री १२ वाजेपर्यंत उपस्थित राहून नगराध्यक्ष म्हणून कर्तव्य बजावले. याबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आज गणपती विसर्जनाच्या अकराव्या दिवशी कुडाळमधील नव्याने साकारलेल्या गणेश घाटावर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी तुडुंब गर्दी केली होती.
यावेळी नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांसह प्रत्यक्ष गणेश घाटावर उपस्थित राहून विसर्जनाच्या संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली आणि कार्यक्रमावर बारकाईने देखरेख ठेवली.
रात्रीचे १२ वाजले तरी जनतेच्या सेवेसाठी प्रत्यक्ष ‘ऑन फील्ड’ नगराध्यक्षा!
भाविकांची गैरसोय होऊ नये, विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि पाहणी कौतुकास्पद आहे. यासाठी स्वतः नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर यांनी उपस्थित राहून पाहणी केली. तसेच प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या.
नगराध्यक्ष झाल्यापासून मागील अडीज वर्षात त्यांनी शहरासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ नगरपंचायतचे नाव राज्यस्तरावर झळकत आहे. जर स्त्रीने एखादी गोष्ट मनात आणल्यानंतर ती काय करू शकते याचे उदाहरण त्यांनी समाजासमोर ठेवले आहे. त्यांनी आजवर केलेले कार्य इतर महिलांसाठी खरोखरच प्रेरणादाई आहे. मेणबत्तीप्रमाणे ‘देह जळो अन् जग उजळो’ म्हणत त्यांनी तहानभूक विसरून नेहमीच कुडाळ शहराचा विचार केला आहे.
त्यांच्या आजवरच्या कार्यकर्तृत्वाचा सुगंध ‘प्राजक्ता’च्या फुलाप्रमाणे नेहमी असाच दरवळत राहील यात तिळमात्र शंका नाही.



Subscribe









