अंकुश जाधव यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीची मागणी
दोडामार्ग : दोडामार्ग–तिलारी मार्गावरील झरेबांबर तिठा हा परिसर सध्या अपघातप्रवण बनला असून, या ठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. वाहनांचा वाढता वेग आणि वाढती वाहतूक लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झरेबांबर तिठ्यावर तातडीने गतिरोधक व रम्बलर बसवावेत, अशी मागणी माजी समाजकल्याण सभापती, सिंधुदुर्ग, प्रदेश सदस्य, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, महाराष्ट्र तथा सहसंघटक, कोकण विभाग–भाजपा अनुसूचित जाती मोर्चा अंकुश जाधव यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडीचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे. झरेबांबर तिठ्यावर दिवसेंदिवस वाहनांची तसेच नागरिकांची वर्दळ वाढत आहे. या मार्गावरून दोडामार्ग–तिलारी तसेच दोडामार्ग–पिकुळे–उमप या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. अनेक वाहने भरधाव वेगाने जात असल्याने पादचारी व स्थानिक नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अपघात रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची गरज
झरेबांबर तिठा परिसरात यापूर्वीही अनेक अपघात झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. २६ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास एका युवकाच्या मोटारसायकलला धडक बसून अपघाताची घटना घडली. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी गतिरोधक व रम्बलर बसवावेत, तसेच आवश्यक ठिकाणी वाहतूक सुरक्षाविषयक फलक लावावेत. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाने झरेबांबर तिठ्याची तातडीने पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अंकुश जाधव यांनी निवेदनातून केली आहे.
अपघातांच्या वाढत्या घटना लक्षात घेता संबंधित विभागाने या मागणीची तातडीने दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Subscribe









