सावंतवाडी बस स्टँड येथील सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणारी महिला जालना येथून ताब्यात

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग व सावंतवाडी पोलिसांची संयुक्त कारवाई

सावंतवाडी : सावंतवाडी बस स्टँड येथून सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या महिलेला जालना येथून ताब्यात घेण्यात आले आहे. संगीता सुभाष जाधव (३५) रा. मंठा, जिल्हा जालना असे तिचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग व सावंतवाडी पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.

सोमवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी सावंतवाडी बस स्टँडमधून १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याबाबतची तक्रार सावंतवाडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणावरून ही चोरी संगीता सुभाष जाधव,वय 35 वर्षे,रा. संग्राम हॉटेलच्या मागे झोपडपट्टी, मंठा,जिल्हा जालना हिने केले असल्याचे निष्पन्न करण्यात आले. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग व सावंतवाडी पोलिस ठाण्याचे पथक यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत सदर आरोपी महिलेस दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी मंठा,जिल्हा जालना येथून सापळा रचून शिताफीने ताब्यात घेण्यात आले.तिच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता तिने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले.नमूद महिलेस सावंतवाडी पोलिस ठाण्याचे पथकाच्या ताब्यात देण्यात आलेले असून तिच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सदरची कारवाई मा.श्री.मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, मा. कु. नयोमी साटम, अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक श्री.प्रवीण कोल्हे व पोलिस निरीक्षक श्री राजेंद्र मगदुम यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, HC, जॅकसन घोन्सालविस, PC अमर कांडर तसेच सावंतवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, PSI अविनाश पाटील, HC शिंदे,WPC गावकर यांच्या पथकाने केली.

error: Content is protected !!