कणकवली – नरडवे मार्गावरील घटना
कणकवली : कणकवली एसटी आगारातून नरडवेच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये कर्तव्यावर असलेल्या एका महिला वाहकाला प्रवाशाने मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बसमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजीपोटी दिलेल्या सूचनेचा राग आल्याने एका ६२ वर्षीय प्रवाशाने थेट महिला वाहकाच्या कानशिलात लगावली. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एसटी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
रविवारी (२७ सप्टेंबर) दुपारी पावणेएकच्या सुमारास कणकवली ते नरडवे मार्गावरील एसटी बस स्थानकावर उभी होती. या बसमध्ये माधुरी वंजारे या महिला वाहक (कंडक्टर) म्हणून ड्युटीवर होत्या. बसमध्ये काही प्रवासी उभे असल्याचे पाहिल्यानंतर, वाहक वंजारे यांनी प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दिनकर अनंत तावडे (वय ६२, रा. हरकुळ बुद्रुक कसालकरवाडी, ता. कणकवली) यांना “मागील रिकामी सीटवर जाऊन बसा, गाडीला अचानक ब्रेक मारल्यास तुम्ही पडू शकता,” अशी सूचना दिली.
आपल्याला बसण्यास सांगितल्याचा राग आल्याने दिनकर तावडे यांनी वाहक माधुरी वंजारे यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यांनी आपल्या डाव्या हाताच्या थापटाने वंजारे यांच्या कानशिलात लगावली. या भ्याड हल्ल्यामुळे वाहक वंजारे यांच्या उजव्या डोळ्याजवळ जोरदार दुखापत होऊन डोळा सुजला. या धक्क्यातून सावरत त्यांनी थेट कणकवली पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती दिली.
महिला वाहकाने दिलेल्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित प्रवासी दिनकर तावडे याच्याविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक वाहतुकीमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर अशा प्रकारे हात उचलल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे.

Subscribe









