सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांत दुष्काळाचा ‘ट्रिगर-१’ लागू

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा; जिल्हाध्यक्ष नवलराज काळे

सिंधुदुर्ग : खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य निकषांच्या आधारे राज्य शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड आणि वेंगुर्ला या आठही तालुक्यांमध्ये ‘दुष्काळ ट्रिगर-१ (प्रथम कळ)’ लागू केला आहे.

यंदा पावसाच्या खंडाचा खरीप पिकांवर परिणाम झाला असून भातासह विविध पिकांच्या नुकसानीची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत सुमारे २६.२ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेतला असून बाधित भागातील प्रत्यक्ष पाहणी, पंचनामे आणि नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याबाबत प्रशासनाला निर्देश दिले आहेत. पालकमंत्री २७ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येऊन भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे समजते.

शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करताना भाजप भटके विमुक्त आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा उपसरपंच नवलराज सुरेखा विजयसिंह काळे म्हणाले,

“संकटाच्या काळात पालकमंत्री नितेश राणे साहेब शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांचा दुष्काळ ट्रिगर-१ मध्ये समावेश झाल्यामुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार मदत व सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. योग्य पंचनामे होऊन शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळेल, असा विश्वास आहे.”

दरम्यान, शेतपिकांच्या नुकसानीबाबतची मदत विहित कार्यपद्धती पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर केली जाणार असल्याची माहिती उपलब्ध आहे.

error: Content is protected !!