उपचारादरम्यान 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
कणकवली : फोंडेकरवाडी येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सूर्यकांत विठ्ठल फोंडेकर (वय 52) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी विष्णू यशवंत तळेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. सूर्यकांत फोंडेकर आणि संशयित विष्णू तळेकर हे एकमेकांच्या परिचयाचे असून दोघेही अधूनमधून एकत्र मद्यपान करत असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीत नमूद आहे.
घटनेच्या वेळी भिकाजी फोंडेकर हे सूर्यकांत यांच्या घरी गेले होते. त्यावेळी सूर्यकांत हे घरात रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले दिसले. संशयित विष्णू तळेकरही तेथे उपस्थित होता. भिकाजी यांनी घटनेबाबत विचारणा केली असता, सूर्यकांत यांनी शिवीगाळ केल्याने त्यांच्यावर मारहाण केल्याचे विष्णूने सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, सूर्यकांत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनीही आपल्याला विष्णू तळेकर याने मारहाण केल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
घटनेनंतर भिकाजी यांनी परिसरातील नागरिकांना मदतीसाठी बोलावले. जखमी सूर्यकांत यांना तातडीने फोंडाघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कणकवली येथे हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी भिकाजी फोंडेकर यांच्या तक्रारीवरून विष्णू यशवंत तळेकर याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम 103(1), 352 तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास कणकवली पोलीस करीत आहेत.


Subscribe








