रोटरी क्लब ऑफ कुडाळ, संविता आश्रम पणदूर आणि आकार फाउंडेशन कुडाळ यांचा संयुक्त उपक्रम
जिल्ह्यात १० हजारांपेक्षा जास्त बंधारे बांधणार – दादा साईल
पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी अशा प्रकारचे बंधारे बांधणे आवश्यक – रो. मकरंद नाईक
कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळ, संविता आश्रम पणदूर आणि आकार फाउंडेशन कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी अडवा… पाणी जिरवा संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या वर्षीचा पहिला वनराई बंधारा अणाव परबवाडी येथे बांधण्यात आला. भविष्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी एक महत्वाचे पाऊल यानिमित्ताने उचलले गेले. यावेळी सदर कार्यक्रमासाठी रोटरी क्लब कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक, सेक्रेटरी राकेश म्हाडदळकर, राजन बोभाटे, असिस्टंट गव्हर्नर अभिषेक माने, राजीव पवार, संविता आश्रम पणदूरचे संदीप परब, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादा साईल, कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक, कुडाळ गटविकास अधिकारी प्रवीण हिरलेकर, अणाव सरपंच लिलाधर अणावकर उपसरपंच सौ. अणावकर, विनायक अणावकर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांना ट्रिगर 1 जाहीर करण्यात आला असून त्या अनुषंगाने पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पाणी बचत व संवर्धन करण्यासाठी वनराई व कच्चे बंधारे बांधण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. याचा शुभारंभ आज रोटरी क्लब ऑफ कुडाळ, संविता आश्रम पणदूर आणि आकार फाउंडेशन यांच्या सहकार्याने अणाव येथून झाला आहे. जल संवर्धनाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल असून भविष्यात उद्भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी असे बंधारे बांधणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. तसेच येत्या १५ दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये १० हजारांपेक्षा जास्त बंधारे बांधण्याचा संकल्प हाती घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यानंतर रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक म्हणाले की, जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असताना पालकमंत्र्यांनी तातडीची बैठक घेऊन पाणी अडवा पाणी जिरवा अंतर्गत लोकसहभागातून बंधारे बांधण्याचे आवाहन केले होते. याची सुरवात रोटरी क्लब ऑफ कुडाळ, संविता आश्रम पणदूर, आकार फाउंडेशन कुडाळ व ग्रामपंचायत अणाव यांच्या माध्यमातून होत असल्याचा अभिमान वाटत आहे असे ते म्हणाले. तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन अशा प्रकारचे बंधारे बांधावे असे आवाहन त्यांनी केले.
जलसंवर्धनाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल असून सर्वांनी पुढाकार घेतल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येचा आपण निश्चित सामना करू असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Subscribe








