सुमारे एक लाखांचे नुकसान
कुडाळ : कुडाळ शहरातील कृष्णाई सुपर मार्केटसमोरील सुलभ शौचालयालगत असलेल्या दुचाकी दुरुस्तीच्या गॅरेजला सोमवारी सायंकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता ही घटना निदर्शनास आली. आगीची माहिती मिळताच कुडाळ नगरपंचायतीचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला आणि काही वेळात आग आटोक्यात आणण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय सोमा सावंत (मूळ सोनवडे, रा. पिंगुळी-म्हापसेकर तिठा) यांचे कृष्णाई सुपर मार्केटसमोर दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. सोमवारी गॅरेज बंद असतानाच सायंकाळच्या सुमारास त्याठिकाणी आग लागली. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या आगीत गॅरेजमधील दुचाकी दुरुस्तीचे साहित्य, ऑइल तसेच शेडवरील पत्रे जळून नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार या आगीत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. कुडाळ नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाने वेळीच कारवाई केल्याने आग अधिक पसरली नाही.
घटनास्थळी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नगरसेविका नयना मांजरेकर, मुख्याधिकारी खंडू पवळ, नगरसेवक मंदार शिरसाट, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, नगरसेवक अभिषेक गावडे यांच्यासह अभय शिरसाट, श्रीराम शिरसाट, अवधूत शिरसाट, बंड्या शिरसाट, आबा धडाम, सतीश साळगावकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, नुकसानग्रस्त संजय सावंत यांना नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नगरसेवक मंदार शिरसाट, नगरसेवक अभिषेक गावडे आणि माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी तत्काळ आर्थिक मदत सुपूर्द केली.


Subscribe








