वैभववाडी : माजी सभापती नासीर काझी यांच्या गाडीची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली. हा प्रकार एका मद्यधुंद तरुणाकडून करण्यात आला. या घटनेत गाडीचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. महेश संभाजी तांबे (रा. केळवली, ता. राजापूर) असे या मद्यपी तरुणाचे नाव असून ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
काझी यांनी काल सायंकाळी नेहमीप्रमाणे आपली गाडी घराशेजारील शेडमध्ये उभी केली होती. बुधवारी पहाटे ४.३० च्या सुमारास तांबे हा मद्यधुंद अवस्थेत काझी यांच्या घराकडे आला होता. त्यावेळी काझी नमाज पढण्यासाठी मशिदीकडे जात होते. त्यांनी तांबे याला समजावून तिथून हाकलून दिले. त्यानंतर तांबे हा माजी पोलीस पाटील गणेश हरयाण यांच्या घरी गेला. त्याने घराच्या दरवाजावर जोरजोरात लाथा मारून आरडाओरड केली.यामुळे गणेश हरयाण आणि त्यांचे कुटुंबीय जागे झाले. त्यांनी लाईट लावून बाहेर येईपर्यंत तांबे तिथून पसार झाला. तिथून तो परत काझी यांच्या घराकडे आला. त्यावेळी काझी कुटुंबीय झोपलेले होते. तांबे याने हातातल्या लाकडी बांबूने काझी यांच्या शेडमध्ये लावलेल्या गाडीच्या मागच्या आणि बाजूच्या काचांवर प्रहार करत काचा फोडण्यास सुरुवात केली. दरम्यान काझी यांचा पुतण्या घराशेजारी असलेल्या पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी आला होता. त्याने आवाज ऐकून पुढे जाऊन पाहिले. त्याला बघून संशयित पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र काझी यांच्या पुतण्याने आरडाओरड केल्यामुळे ग्रामस्थ जमा झाले आणि त्यांनी तांबे याला रंगेहात पकडले. या घटनेची माहिती वैभववाडी पोलिसांना देण्यात आली. वैभववाडीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत त्या तरुणाला ताब्यात घेतले.













