कारण गुलदस्त्यात
एका संशयितांच्या विरोधात खूनाचा गुन्हा
गावातील एक संशयित पोलिसांच्या ताब्यात
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील कवठी- अन्नशांतवाडी येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संदिप उर्फ बाळा दामोदर करलकर (वय-५२), याचा मृतदेह त्याच्या घरातच आढळून आला. मृतदेहावरच्या अंगावरच्या जखमा आणि आजूबाजूला असलेले रक्त पाहता संदीप याचा खुन करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणी निवती पोलिसांनी गावातीलच एका संशयितावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची टिम रवाना झाली आहे. गावात पोलिसांकडुन गुन्ह्याचा तपास करुन गावातील एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर या प्रकरणात अन्य दोघे- तिघेजण असल्याची माहिती समोर आली आहे. या खुना मागचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाच ते सहा वाजता सुमारास घडली. या प्रकरणी मयत संदीप करलकर याचा भाऊ संतोष करकर यांने निवती पोलीस ठाण्यात संदिप करलकर याचा खून केल्याची फिर्याद निवती पोलीस स्थानकात दिली आहे; त्यानुसार निवती पोलिसांनी अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
कुडाळ तालुक्यातील कवठी अन्नशांतवाडी ही अति दुर्गम भागात वसलेली वाडी आहे. दहा ते बारा घरं असलेली ही छोटीशी वाडी असुन या वाडीत मयत संदीप उर्फ बाळा दामोदर करलकर हा कवठी अन्नशांतवाडी येथील आपल्या घरी एकटाच राहत होता. त्याचे वाडीत सहसा कोणासोबत पटत नव्हते. संदीपला अजून दोन भाऊ होते. त्यापैकी एका भावाचे निधन झाले आहे. दुसरा भाऊ संतोष दामोदर करलकर हा मुंबईला नोकरीला असतो. रविवार दि.९ फेब्रुवारीला त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी संतोष गावी आला होता. गुरुवार दि. २० फेब्रुवारीला वडिलांचे दिवसकार्य संपले आणि शुक्रवार दि.२१ फेब्रुवारी रोजी आईला पॅरेलिसीसचा अटॅक आला म्हणून तिला सिंधुदुर्ग नगरी येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मयत भावाचा गावातील उपद्रव पाहून संतोषने तिला अधिक उपचारासाठी मंगळवार दि.२५ फेब्रुवारीला आपल्यासोबत मुंबईला नेले. पण तिथे उपचारासाठी आधारकार्डची आवश्यकता लागली, ते घेवून जाण्यासाठी आपल्या पुतण्यासोबत संतोष करलकर शुक्रवारी आपल्या गावी कवठीला आला असता त्याला आपला भाऊ घरात रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला दिसला.
दरम्यान शुक्रवारी संदीप करलकरचा खून झाल्याचा फोन जिल्हा पोलिस अधीक्षक, निवती व कुडाळ पोलीसांना गेला, त्या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षकांनी निवती व कुडाळ पोलीसांना तात्काळ घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले, त्यानंतर कवठी येथील अन्नशांतवाडी येथे उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे, कुडाळ पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, निवती पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड, कुडाळ पोलीस स्थानकचे गणेश कराडकर आदिंसह पोलिसांची टिम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी घटनास्थळी तपासणी सुरू करत हा खुनच असल्याचे सांगितले. घटनास्थळी डॉग स्कॉड दाखल झाले मात्र काही अंतरावर डॉग स्कॉड घुटमळले. ठसे तज्ञांनी घटनास्थळी ठशे घेतले. दरम्यान सायंकाळी उशिरा गावातीलच एका व्यक्तीला संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला निवती पोलीस स्थानकात हजर केले व चौकशी सुरू केली. या घटनेत अन्य काही संशयित पोलिसांच्या रडारवर असल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे कवठी गावात एकच खळबळ उडाली आहे. मयत संदिप करलकर यांच्या पश्चात आई, भाऊ, पुतण्या असा परिवार आहे.













