रत्नागिरी: मत्स्य आणि बंदर विकास मंत्री पदाचे खाते आ.नितेश राणे यांच्याकडे आल्यापासून कोकण किनारपट्टीचा दर्यावर्दी सेनापती म्हणूनच सर्वसामान्य मत्स्यव्यवसायिकांमधे त्यांची नवी ओळख होत आहे.कोकण किनारपट्टीवर होत असलेली परप्रांतीयांची अवैध मासेमारी तसेच कोकण किनारपट्टीवरील त्यांचा अवैध शिरकाव या सगळ्यालाच आता चाप बसला आहे.
रत्नागिरी किनारपट्टीवर गेल्या दोन दिवस झालेल्या कारवाईची गंभीर दखल मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घेतली आहे. संबंधित नौका मालकांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले असून. कोणत्याही पद्धतीत पारंपरिक मच्छीमारांवर गदा येईल अशा पद्धतीने अवैध मच्छीमारी खपवून घेतली जाणार नाही. असा इशारा त्यांनी दिला आहे.
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे हे १३ जानेवारीला रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. दुपारी ३ वाजता शासकीय विश्रामगृहात विविध विभागांची बैठक आयोजित केली असून दरम्यान मत्स्यव्यवसाय / बंदरे या बाबींवर चर्चा होणार आहे. बैठकीस पोलीस विभाग, बंदर विभाग, कस्टम विभाग, भारतीय तटरक्षक दल.मत्स्यव्यवसाय विभाग आदी यंत्रणांचा सहभाग असेल.
सलग दोन नौकांवर कारवाई
दरम्यान दि. ८ जानेवारी रोजी रात्रौ रत्नागिरी गोळप- पावस बंदरा समोर मलपी कर्नाटक येथीलपरप्रांतीय नौका “अधिरा” क्र. १ND-K१-०२-MM-५७२४ मासेमारी करत असताना मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेने ताब्यात घेतली. तर सलग दोन दिवसांनी म्हणजेच दि १० जानेवारी रोजी कस्टम विभागाने रत्नागिरी किनारपट्टी समोर सुमारे १० ते १२ सागरी मैला दरम्यान नौका क्र. “IND- MH-08-MM-४०५३” या नौकेवर अनधिकृतपणे LEDलाईट्स व जनरेटर वापरात असलेली त्यांचे गस्ती दरम्यान पकडण्यात आली आहे.













