स्थानिक भूमिपुत्रांच्या व्यवसायावर अन्याय सहन करणार नसल्याची असोसिएशनची ठाम भूमिका
केतन शिरोडकर / कुडाळ
कुडाळ तालुक्यात गॅरेज व्यवसायाच्या क्षेत्रात स्थानिक आणि परप्रांतीय व्यावसायिकांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. स्थानिक टू-व्हीलर मेकॅनिक व्यावसायिकांच्या विविध प्रश्नांवर कुडाळ तालुका टू-व्हीलर मेकॅनिक असोसिएशनने एकजुटीची भूमिका घेतली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील पिंगुळी-गुढीपूर परिसरात परप्रांतीय व्यावसायिकांकडून नव्याने गॅरेज सुरू करण्यात येत असल्याने स्थानिक गॅरेज व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पिंगुळी-गुढीपूर येथील शिव शक्ती ऑटो स्पेअर पार्ट्स येथे कुडाळ तालुका टू-व्हीलर मेकॅनिक असोसिएशनची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला कुडाळ तालुक्यातील २५ ते ३० हून अधिक गॅरेज चालक व मेकॅनिक उपस्थित होते. यावेळी स्थानिक मेकॅनिकांच्या व्यवसायासमोरील अडचणी, वाढती व्यावसायिक स्पर्धा, परप्रांतीय गॅरेज चालकांचा प्रश्न आणि संघटनेच्या पुढील भूमिकेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
स्थानिक भूमिपुत्रांच्या व्यवसायावर अन्याय नको!
परप्रांतातून येणाऱ्या व्यावसायिकांमुळे स्थानिक मेकॅनिकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. बाहेरून येणाऱ्या व्यावसायिकांनीही व्यवसाय करण्यास हरकत नाही.स्थानिक भूमिपुत्रांच्या व्यवसायावर गदा येता कामा नये. कोणाच्याही व्यवसायाला विरोध करणे हा उद्देश नसून स्थानिक मेकॅनिकांवर अन्याय होऊ नये, हीच आमची भूमिका असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सदस्यांच्या सुख-दुःखात असोसिएशन खंबीरपणे पाठीशी.
कुडाळ तालुका टू-व्हीलर मेकॅनिक असोसिएशन ही केवळ व्यावसायिक प्रश्न सोडविणारी संघटना नसून सदस्यांच्या सुख-दुःखात आणि अडचणीच्या काळात खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहणारी संघटना आहे. असोसिएशनच्या सदस्यांच्या शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांना काही अडचणी निर्माण झाल्यास तसेच एखाद्या गॅरेज मेकॅनिकला वैयक्तिक, कौटुंबिक किंवा व्यावसायिक अडचण उद्भवल्यास संघटनेच्या माध्यमातून शक्य ती मदत व सहकार्य केले जाते.
सदस्यांनी एकमेकांच्या पाठीशी उभे राहून अडचणीच्या काळात परस्परांना आधार देण्याची परंपरा असोसिएशनने जपली आहे. त्यामुळे स्थानिक मेकॅनिकांच्या हितासाठी आणि त्यांच्या व्यवसायाच्या संरक्षणासाठी संघटना एकजुटीने काम करणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, स्थानिक मेकॅनिकांच्या व्यवसायावर परिणाम होईल अशा पद्धतीने परप्रांतीय गॅरेज सुरू होत असतील, तर ते कदापि सहन केले जाणार नाही, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. स्थानिक व्यावसायिकांचे हित जपण्यासाठी सर्व मेकॅनिकांनी संघटित राहण्याचे आवाहनही करण्यात आले.
कुडाळ तालुक्यातील टू-व्हीलर मेकॅनिक व्यावसायिकांमध्ये एकजुटीचा संदेश गेला असून, स्थानिक व्यावसायिकांच्या प्रश्नांवर असोसिएशन आगामी काळात कोणती पावले उचलणार, याकडे आता तालुक्यातील गॅरेज व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.


Subscribe







