वाघाचे दात, बिबट्याची नखे व सोन्यात मढवलेले सुळे असा मुद्देमाल जप्त
कुडाळ बसडेपो येथे वनविभागाची कारवाई
कुडाळ : कुडाळ बस डेपो काळपणाका येथे वनविभागाने सापळा रचून वन्यप्राण्यांच्या अवयवांची विक्री करणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे. १२ वाघनखांसाठी अडीच लाख रुपयांचा व्यवहार ठरला असताना वनाधिकाऱ्यांनी झडप घालून तीन आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एका शिपायाचाही समावेश असून त्यांच्याकडून वाघाचे दात, बिबट्याची नखे व सोन्यात मढवलेले सुळे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक ०२.११.२०२६ रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ सावंतवाडी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक वनसंरक्षक (खा.कु.तो. व वन्यजीव) सावंतवाडी तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ व त्यांचे अधिनस्त वनकर्मचारी यांनी संयुक्तरित्या सापळा रचला.
आरोपी क्र. १ रोहिदास हरिश्चंद्र कामत, वय ४८ हा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बस स्थानकामध्ये शिपाई म्हणून कर्तव्यावर आहे. त्याने गुप्त बातमीदाराकरवी बनावट गिऱ्हाईक म्हणून तयार केलेल्या वनअधिकाऱ्यांना पैशांच्या लोभापायी वेंगुर्ला बस स्थानकावर बोलावून घेतले. तेथेच बनावट गिऱ्हाईक बनून गेलेल्या वनाधिकाऱ्यांकडे वाघनखांच्या विक्री व्यवहारात ठरलेली रोख रक्कम आहे का याची खातरजमा करून १२ वाघनखांसाठी २,५०,०००/- रुपयांचा विक्री व्यवहार नक्की केला.
वनाधिकाऱ्यांना कुडाळ बस डेपोमध्ये वाघनखे घेऊन एक इसम येईल, त्याला रोख रक्कम द्या असे सांगितल्यावरून वनाधिकाऱ्यांनी कुडाळ बस डेपो काळपणाका येथे सापळा रचला. त्या ठिकाणी आरोपी क्र. १ याने आरोपी क्र. ३ यास आरोपी क्र. २ च्या करवी पुढे वाघनखे दाखविण्यास पाठविले. व्यवहाराची बोलणी होत असतानाच मौजे कुडाळ काळपणाका येथील बस डेपोच्या प्रवेशद्वारावर वनाधिकाऱ्यांनी झडप घालून आरोपी क्र. १ ते ३ यांना ताब्यात घेतले.
सदर आरोपींची अंगझडती घेतली असता –
१) वन्यप्राणी वाघ दातसुळा नग ०१ – लांबी ५ सेमी.
२) वन्यप्राणी बिबट नखे नग ०२ – लांबी ४ सेमी.
३) वन्यप्राण्याचे सोन्यात मढवलेले सुळेदात नग ०२ – लांबी २ सेमी.
असा मुद्देमाल अंगझडतीमध्ये जप्त करण्यात आला.सदरचा मुद्देमाल हा वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अनुसूची १ अन्वये संरक्षण प्राप्त वन्यप्राणी बिबट्याची शिकार करून त्यापासून मृगयाचिन्हे तयार करून विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या बाळगल्याने जप्त करून ताब्यात घेण्यात आला.
या प्रकरणी वनपाल नेरूर तर्फे हवेली यांनी प्र.गु.रि. ०३/२०२६ दि. ०२.११.२०२६ चा गुन्हा नोंद केला आहे. सदर वन्यप्राणी बिबट नखे विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगल्याचा गुन्हा मान्य केल्याने आरोपींना अटक करून मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कुडाळ यांच्या न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपी क्र. १ ते २ यांना ०२ दिवसांची वन कोठडी तर आरोपी क्र. ३ यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कारवाई करणारे पथक –
सदरची कारवाई मा. श्री. मिलीश शर्मा, उपवनसंरक्षक सावंतवाडी, श्री. किरण जगताप, अतिरिक्त कार्यभार उपवनसंरक्षक सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्री. सुनिल लाड यांच्या नेतृत्वाखाली श्री. चेतन पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ, श्री. संजय हजारे वनपाल मठ, श्री. सूर्यकांत सावंत वनपाल नेरूर त. हवेली, श्री. गौरेश राणे, पोह. सं. व अ. नि. सावंतवाडी, श्री. अतुल खोत वनरक्षक धामापूर, श्री. ब्रम्हकुमार भोजने वनरक्षक तुळस, श्री. अनिकेत माने वनरक्षक मांगगाव, श्री. समीर खरबत वनरक्षक नेरूर, श्री. प्रविण कमळकर वनरक्षक मठ, श्री. राहुल मयेकर चालक यांनी पार पाडली.


Subscribe








