सहा महिन्यांची चिमुकली पोरकी
कुडाळ : माणगाव खोऱ्यातील कालेली-धरणवाडी येथील निर्मला नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या ३३ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ही घटना घडली. प्रतिराज उर्फ राजू भार्गव कुडपकर (रा. वेंगुर्ले-कॅम्प, भटवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे वेंगुर्ले परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिराज हा शनिवारी आपला चुलतभाऊ आणि मित्रासोबत वेंगुर्ले येथून माणगाव येथे गेला होता. मित्राच्या नातेवाईकांची भेट घेतल्यानंतर तिघेही कालेली-धरणवाडी येथील देवकोंड परिसरात निर्मला नदीत अंघोळीसाठी उतरले. यावेळी पाण्यात असताना प्रतिराजचा पाय दगडावरून घसरला. तोल जाऊन तो दगडावर आदळला आणि नदीपात्रातील चिखलात अडकून पाण्यात बुडाला.
प्रतिराजला वाचविण्यासाठी त्याच्या चुलतभावाने आणि मित्राने तातडीने प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले नाही. या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिस दूरक्षेत्रातील पोलिस अधिकारी आणि कुडाळ पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पोलिस पाटील आणि ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला.
मृतदेह कुडाळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची कुडाळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मृताच्या चुलतभावाने यासंदर्भात पोलिसांत फिर्याद दिली आहे.
प्रतिराज कुडपकर हा स्लायडिंगचा व्यवसाय करत होता. मित्रपरिवारात तो राजू या नावाने ओळखला जात होता. त्याच्या पश्चात पत्नी, सहा महिन्यांची मुलगी, आई, भाऊ, भावजय आणि अन्य नातेवाईक असा परिवार आहे. अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकलीच्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत असून कुडपकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


Subscribe







