जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत पिंगुळीच्या सेल्फ डिफेन्स अकॅडमीचे घवघवीत यश

सहा खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड.

केतन शिरोडकर/पिंगुळी

ओरोस येथे आयोजित जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत पिंगुळी येथील सेल्फ डिफेन्स अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत यशाचा ठसा उमटवला. मुलांच्या आणि मुलींच्या गटातील खेळाडूंनी विविध क्रमांक पटकावत अकॅडमीचा नावलौकिक वाढवला आहे. या स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर खेळाडूंची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

या जिल्हास्तरीय स्पर्धेत १४ वर्षीय वयोगटात ध्रुव कोकरे याने प्रथम क्रमांक पटकावला. तर १७ ते १९ वर्षीय मुलांच्या गटात सिद्धेश कुंभार याने प्रथम क्रमांक, तर मुसेफ पटेल याने द्वितीय क्रमांक मिळवला.

मुलींच्या १७ ते १९ वर्षीय वयोगटात इरम शेख हिने द्वितीय क्रमांक, साधना धामणेकर हिने तृतीय क्रमांक, तर मिसबा शेख हिने उत्तेजनार्थ यश संपादन केले. या सर्व खेळाडूंची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

खेळाडूंनी मिळवलेल्या या यशाबद्दल सेल्फ डिफेन्स अकॅडमीचे संचालक संदीप आकेरकर यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळाडूंना सातत्यपूर्ण प्रशिक्षण, मेहनत आणि मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश मिळाले असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

यशस्वी खेळाडूंचा पिंगुळी ग्रामपंचायतीचे सरपंच अजय आकेरकर, डॉक्टर योगिता राणे, परेशराम धामणेकर आणि गजानन कोकरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी योगेश कुंभार, विजय तुडीयेकर, सचिन आकेरकर तसेच खेळाडूंचे पालक उपस्थित होते.

पिंगुळीच्या या खेळाडूंनी जिल्हास्तरावर मिळवलेल्या यशामुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, आता विभागीय स्पर्धेतही ते अशीच चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!