अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल
सावंतवाडी: येथील मध्यवर्ती एसटी बस स्थानक परिसरात वाढत्या चोऱ्यांचे सत्र सुरुच असून, एका महिला प्रवाशाच्या पर्समधून तब्बल १२ तोळे सोन्याचे ऐवज लांबविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ही हातसफाई केली. भरदिवसा घडलेल्या या मोठ्या चोरीच्या घटनेमुळे स्थानक परिसरातील प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक व त्यांच्या तपास पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून संशयितांचा कसून शोध घेतला जात आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता, त्यात एक संशयित महिला आणि एक पुरुष दिसून आले आहेत. या वर्णनाशी मिळतीजुळती कोणतीही व्यक्ती सावंतवाडी स्थानक किंवा शहरात आढळल्यास, अथवा या चोरीबाबत काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ सावंतवाडी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर शहरात आणि बस स्थानक परिसरात पोलीस गस्त वाढवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, या चोरीच्या निमित्ताने शहरातील नादुरुस्त आणि बंद अवस्थेत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने याप्रकरणी ठोस कारवाई करत बंद कॅमेरे त्वरित सुरू करावेत, अशी तीव्र मागणी आता सावंतवाडीकर नागरिकांमधून केली जात आहे.


Subscribe








