अभिनेत्री मनिषा इंगळे व अभिनेता सनी कांबळे यांच ‘फुलपाखरू’ गाणं प्रदर्शित
बालपण म्हणजे निरागसता, कल्पनाशक्ती, स्वप्नं आणि आनंदाने बहरलेलं एक सुंदर विश्व! याच भावविश्वाची रंगत अनुभवायला लावणारं ‘फुलपाखरू’ हे नवं मराठी गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सोशल मीडिया क्वीन, अभिनेत्री मनिषा इंगळे, अभिनेता सनी कांबळे व बालकलाकार रिधिमा निचित हे कलाकार या गाण्यात आहेत. टाइमलेस स्लेट्स प्रस्तुत आणि टाइमलेस स्लेट्स प्रॉडक्शन्स निर्मित या गाण्यात एका चिमुकल्या परीचं रंगीबेरंगी, स्वप्नवत आणि कल्पनारम्य विश्व पाहायला मिळत आहे. रंगीबेरंगी फुलपाखरं, परीचं रूप, आकर्षक दृश्यरचना आणि कुटुंबातील प्रेमळ क्षण यांची सुंदर सांगड या गाण्यात घालण्यात आली आहे. गाण्याच्या पोस्टरने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
या गाण्याचं चित्रीकरण पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलं आहे. या गाण्याची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन सनी कांबळे यांनी केलं आहे. निर्मितीची धुरा सनी कांबळे आणि तेजस पानसरे यांनी सांभाळली आहे. संगीत प्रज्वल यादव आणि विवेकानंद सणप यांचं असून नव्या सणप आणि ऋषभ साठे यांनी गायन केलं आहे. गीतलेखन विवेकानंद सणप यांचं आहे. असिस्टेंट डिरेक्टर रोहन वाते आणि कुमार गायकवाड, लाईन मॅनेजर प्रीतम कांबळे, एडिटिंग विनय शिंदे, डीआय मयूर सातपुते, व्हीएफएक्स असारफ शेख, तर आर्ट डिरेक्शन सनी कांबळे आणि नितीश कुमार यांनी सांभाळलं आहे. प्रसिद्धी डिझायनर अनिकेत महाडिक असून पीआर विनया सावंत (फॉरेवर पी आर) यांनी पाहिलं आहे. या गाण्यातील बीटीएस रवी शिंदे, प्रिया व रुद्र यांनी केले आहे.

अभिनेत्री मनिषा इंगळे गाण्याच्या चित्रीकरणाविषयी सांगते, “मला गाण्याची ऑफर आली तेव्हा मी लगेचच हो म्हटलं होतं, मी पहिल्यांदाच एका आईच्या भूमिकेत काम केल आहे. याआधी मी अनेक रोमॅंटीक- ट्रेंडींग गाण्यांमध्ये काम केलं आहे. गाण्याचं चित्रीकरण पुण्यातील शहरात तसेच पुण्याच्या नजिक असलेल्या गावांमध्ये झालं आहे. या प्रॉडक्शनने व्यवस्था उत्तमरित्या केली होती. त्यामुळे चित्रीकरण करताना खूप मज्जा आली. विशेष म्हणजे गाण्यातील सीन्समधील सेटअप खूपच सुंदर होता. बालपणातील निरागसता, कुटुंबातील प्रेम आणि कल्पनाविश्वातील रम्य क्षण यांचा सुंदर अनुभव देणारं ‘फुलपाखरू’ हे गाणं लहान मुलांसह मोठ्यांनाही नक्कीच भावेल. अशी मी आशा व्यक्त करते.”




Subscribe





