ओबीसी महामंडळाच्या थकबाकीदारांना मोठा दिलासा.

थकीत व्याजावर मिळणार ५० टक्के सवलत.

३१ मार्च २०२७ पर्यंत कर्जफेडीची संधी.

केतन शिरोडकर / सिंधुदुर्ग

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फत व्यवसायासाठी कर्ज घेतलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातील थकबाकीदार लाभार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळाच्या एकरकमी परतावा (वन टाइम सेटलमेंट) योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना थकीत व्याजाच्या रकमेवर ५० टक्के सवलत मिळणार आहे. ही योजना ३१ मार्च २०२७ पर्यंत लागू राहणार आहे.

कर्जाच्या व्याजात ५० टक्के सवलतीची संधी

महामंडळाच्या विविध कर्ज योजनांद्वारे व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घेतलेल्या आणि कर्जाची परतफेड थकीत असलेल्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये मुदत कर्ज योजना, बीज भांडवल कर्ज योजना, स्वर्णिमा कर्ज योजना आणि मार्जिन मनी कर्ज योजना आदींचा समावेश आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना संपूर्ण थकीत कर्जरकमेचा एकरकमी भरणा करणे आवश्यक आहे. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना थकीत व्याजाच्या रकमेवर ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे कर्जफेड करू न शकलेल्या लाभार्थ्यांना कर्जाचा बोजा कमी करण्याची आणि कर्जमुक्त होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

पात्र लाभार्थ्यांनी मुदतीत लाभ घ्यावा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामंडळाच्या सर्व थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेची माहिती घेऊन निर्धारित मुदतीत कर्जाची परतफेड करावी आणि योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक प्रीती पटेल यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधा

कार्यालय : शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी, ओरोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.

जिल्हा व्यवस्थापक संपर्क : ८६६८८९८९५०

दूरध्वनी : ०२३६२-२२८११९

error: Content is protected !!