हिर्लोक येथील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील वागदे येथे दुचाकीचा अपघात होऊन गंभीर जखमी झालेल्या प्राची प्रदीप मसुरकर (वय ३२, रा. हिर्लोक, ता. कुडाळ) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोवा येथील बांबुळी रुग्णालयात २७ ऑक्टोबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या अपघातप्रकरणी दुचाकीचालक उमेश प्रदीप कदम (वय ३४, रा. आंब्रड) याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राची मसुरकर या कणकवलीतील एका खासगी रुग्णालयात कार्यरत होत्या. २६ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे ५.४० वाजता त्या उमेश कदम यांच्यासोबत दुचाकीने कुडाळच्या दिशेने जात होत्या. वागदे येथील विश्रांती हॉटेलसमोर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. या धडकेत प्राची मसुरकर आणि दुचाकीचालक उमेश कदम हे दोघेही गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर दोघांनाही उपचारासाठी ओरोस येथे दाखल करण्यात आले. प्राची यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी गोव्यातील बांबुळी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांचे वडील सुनील शिवराम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


Subscribe








