मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सुविधा सुरू

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ लाभार्थीभिमुख योजनांसाठी महाडीबीटी २.० प्रणालीवर ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याच्या सुविधेचा बुधवारी २८ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे शुभारंभ करण्यात आला.

राज्यात मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे सुलभीकरण करण्यासाठी शासनाकडून Government Process Re-engineering (GPR) अंतर्गत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून लाभार्थ्यांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही ऑनलाइन सुविधा सुरू करण्यात आली आहे.

या सुविधेमुळे राज्यातील मच्छीमार, मत्स्यशेतकरी, मत्स्यव्यावसायिक आणि मच्छीमार संस्थांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तसेच अनावश्यक ऑफलाइन कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता कमी होणार असून, शासकीय डेटाबेसमधून आवश्यक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विविध प्रमाणपत्रे ऑनलाइन स्वरूपात मिळण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योजनांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे.

ऑनलाइन अर्ज प्रक्रियेमुळे कागदपत्रांची पूर्तता करणे सोपे होणार असून, योजनांचा लाभ मिळविण्यासाठी लागणारा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे. पारदर्शक आणि गतिमान कार्यपद्धतीमुळे मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे घेता येणार आहे.

या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांनी https://mahadbt2.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

error: Content is protected !!