महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सिंधुदुर्गात मेणबत्ती क्लस्टर उभारणार.

फाईन आर्टिस्ट नंदिनी रामचंदानी यांचे प्रतिपादन.

कुडाळमध्ये महिलांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात.

केतन शिरोडकर /कुडाळ

महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेणबत्ती निर्मितीचा क्लस्टर उभारण्याचा मानस आहे. महिलांनी जिद्द, चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर स्वतःचा उद्योग उभारावा. यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यास आपण सदैव तत्पर राहू, असे प्रतिपादन फाईन आर्टिस्ट व क्राफ्ट ट्रेनर सौ. नंदिनी रामचंदानी यांनी कुडाळ येथे केले.

कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नाशिक आणि आश्रय प्रतिष्ठान, कुडाळ एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगारनिर्मितीच्या उद्देशाने महिलांसाठी दोन दिवसीय विविध प्रशिक्षण शिबिराचे आयोजन कुडाळ येथील शिवाजीनगरमधील दैवज्ञ समाज भवन येथे करण्यात आले होते. या शिबिरात सौ. नंदिनी रामचंदानी यांनी महिलांना मार्गदर्शन केले. कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नाशिकच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. सुनीता मोडक यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना सौ. रामचंदानी म्हणाल्या की, कोकणातील महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. महिलांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या दृष्टीने विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांचा योग्य अभ्यास करून त्यातून तयार होणाऱ्या उत्पादनांना बाजारपेठ कशी मिळवायची, याकडेही महिलांनी लक्ष दिले पाहिजे.

केवळ प्रशिक्षण घेऊन थांबू नका, तर त्या कौशल्याचे व्यवसायात रूपांतर करा, असे आवाहन करत त्यांनी भविष्यात उत्पादनांची बाजारपेठ निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. डॉ. सुनीता मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गातील महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण करण्यासाठी शासनाचे विविध उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

फॅब्रिक पेंटिंगपासून आकर्षक मेणबत्ती निर्मितीपर्यंत प्रशिक्षण

या दोन दिवसीय शिबिरात महिलांना विविध प्रकारच्या कलाकुसरीचे आणि हस्तकलेचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. फॅब्रिक पेंटिंगअंतर्गत कापडासाठी योग्य रंगांची निवड, ब्रशचा वापर, विविध चित्रकला तंत्रे, फुलांची पारंपरिक व आधुनिक डिझाइन्स, स्टेन्सिल तंत्र, रंगांचे मिश्रण, शेडिंग तसेच कापडावरील रंग अधिक काळ टिकण्यासाठी आवश्यक पद्धतींची माहिती देण्यात आली.

याशिवाय रेझिन ट्रे, कोस्टर, कीचेन, फोटो फ्रेम, आरती थाळी, पिलर मेणबत्ती, स्तंभाकार मेणबत्ती, फॅन्सी दिवा मेणबत्ती, लाडू मेणबत्ती आणि सुगंधी जार मेणबत्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

उत्पादनांना आकर्षक स्वरूप देण्यासाठी पिलो बॉक्स, स्लाइडिंग बॉक्स, पेपर बॉक्स, ड्रॉवर बॉक्स, षटकोनी बॉक्स, विंडो बॉक्स, कागदी पिशव्या आणि पाकिटे तयार करण्याचेही मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे महिलांना घरबसल्या लघुउद्योग सुरू करण्यासाठी तसेच स्वतःच्या कलागुणांना व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी नवी दिशा मिळाली.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

या वेळी आश्रय प्रतिष्ठानचे माधव गोरे, मणिकर्णिका संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा उन्मेषा दाभोलकर, सतीश पाथरूट, श्री. दाभोलकर, ज्येष्ठ महिला उद्योजिका श्रीमती रेश्मा जळवी, शिवप्रेमी प्रतिष्ठानचे विवेक पंडित, रमाकांत नाईक, मृणाल सावंत, कीर्ती पाटील, प्रियांका सुकाळे, उमेश दाभोलकर, स्वाती पेडणेकर, मंगेश राऊत, पूजा कुडव, सानिका सावंत, स्वप्नाली जळवी, दर्शना धुरी, दर्शना मार्गी, वृंदा राऊत, गोविंद जळवी, दीपेश मांजरेकर, हरेश घाडी, दुर्वांकुर घाडी, ओंकार पाटील आदी उपस्थित होते.

महिलांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरले.

error: Content is protected !!