✒️ प्रासंगिक/ राजन चव्हाण (सिंधुदुर्ग)
बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट. महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरु होतं. गृह राज्यमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या या साहेबाच्या दालनात जिल्ह्याच्या पर्यटन विकासावर एक बैठक सुरु होती.हे साहेब शरद पवार साहेबांचे अत्यंत निकटवर्ती.त्यांच्याकडे पर्यटन विभागही होता. शिवाय ते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कर्मचारी संघटनेचे (इंटक )अध्यक्षही होते.
पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एक गुजराती भाषिक अधिकारी होते.पर्यटन वाढीसाठी वेगवेगळे इव्हेंट करणं उदा.गणेश फेस्टिवल, एलिफंटा फेस्टिवल, अजिंठा-वेरूळ फेस्टिवल,सर्वत्र ‘रिसॉर्ट’ची उभारणी, टूर्स आयोजित करणं इत्यादी.मात्र वेगवेगळे प्रयोग करून महामंडळ कायम तोट्यात.विधिमंडळात तर महामंडळाच्या कारभारावर कायम टीका होत असे.
बैठक सुरू असतानाच मराठवाड्यातील एका विरोधी पक्ष आमदाराने दालनात प्रवेश केला.त्यांना पाहून मंत्रीमहोदय म्हणाले, बरं झालं तुम्ही आलात…पर्यटनविषयक बैठक सुरू आहे आणि त्यातच समोर बसलेल्या ‘त्या ‘ एम.डी.’ना पाहून आमदार महाशयांचे डोकेच फिरले आणि त्यांनी मिडास राजाची गोष्ट सांगायला सुरुवात केली.हा राजा म्हणे ज्या वस्तुला हात लावायचा त्याचे सोने व्हायचे.मात्र आमचे पर्यटन महामंडळ आणि महामंडळाचा ‘राजा ‘ (एम.डी.)जे जे इव्हेंट करतो,उपक्रम करतो त्याची सोन्याऐवजी माती करतो.आमदार साहेबाची ही संतप्त प्रतिक्रिया ऐकून दालनात सन्नाटा पसरला. ‘एसी’ असलेल्या या दालनात ‘एमडी ‘ला अक्षरश: घाम फुटला.अर्थात मिडास राजाची गोष्ट आणि पर्यटन महामंडळाचा कारभार याचा अर्थाअर्थी कुठे संबंध,संदर्भ नसला तरी त्यांना जे काय म्हणायचं होतं ते चुकीचं नव्हतं.
हे सर्व लिहायचं कारण म्हणजे या ‘एम.डी.’ महाशयांची ‘ बुरी ‘नजर वेंगुर्ल्यातील या ऐतिहासिक सागर बंगल्यावर गेली.(या बंगल्याचा पूर्वेइतिहास खूप रंजक आहे )
एके दिवशी हे ‘एम डी’ महाशय अचानक हेलिकॉप्टरने वेंगुर्ल्यात आले. वेंगुर्ला बंदर आणि सागर बंगल्यावर दोन वेळा घिरट्या घालून हेलिकॉप्टर तारकर्लीत गेले तिथे दोन घिरट्या घालून मुंबईकडे गेले. एव्हाना वेंगुर्ला शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बघता बघता मुंबईकर चाकरमान्यांनाही समजली.मग काय कोण, कशासाठी आलं होतं याचा शोध सुरु झाला.लोक तर्क- वितर्क करू लागले.’ चर्चिल ‘ चर्चा करू लागले.ही चर्चा सुरु असतांना एका चाकर मान्याने बातमी आणली एम टी डी सी सागर बंगला ताब्यात घेऊ पहातंय. आणि मग काय….बाळ नार्वेकर, श्रीधर मराठे, अरुण काणेकर या पत्रकारांनी शरद पवार यांचे निकटवर्ती आंबा बागायतदार शिवाजी कुबल यांना सोबत घेऊन मुंबई गाठली.मंत्रालयात ही सर्व मंडळी आल्यानंतर जेष्ठ पत्रकार चंद्रकांत बोगटे मंत्रालयातील आम्ही काही सिंधुदुर्गवासी पत्रकार अरुण भाई मेहता आणि तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना भेटलो. केवळ सागर बंगलाच नव्हे तर कोकण किनारपट्टीवर ऐन मोक्याच्या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावर असलेली बांधकाम विभागाची विश्रामगृहे पर्यटन महामंडळाच्या ताब्यात देऊ नयेत अशा स्पष्ट सूचना मोहिते पाटील यांनी त्यावेळी दिल्या.
अशा या ऐतिहासिक, सुंदर आणि आकर्षक वास्तूत विरेंद्र सिंह यांचा एका रात्रीसाठी मुक्काम होता.दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या प्रश्नावर त्यांची आढावा बैठक सुरु झाली.बैठकीत विविध विभागांचा आढावा सुरु असतांना सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा सुरु झाला आणि त्यांनी या विभागाची झाडाझडती करत विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतल्याचं समजलं.आदल्या रात्री सागर बंगल्यात असं काय घडलं की ज्यामुळं सचिवसाहेब इतके संतप्त झाले..? बैठक संपल्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये एकच कुजबुज सुरु होती.कोण म्हणलं, सिंहसाहेब ज्या ‘सूट’ मध्ये थांबले होते तो ‘सूट’ बरोबर नव्हता. त्याची देखभाल दुरुस्ती केलेली नव्हती. कोंदट वातावारण होतं, कोण म्हणत होतं स्वच्छतागृह स्वच्छ नव्हतं, बाथरूममध्ये वायर व बल्ब लोंबकळत होता. कोण आणखी वेगळंच म्हणत होतं.
खरं तर सिंह हे जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी. आपल्या कामातून त्यांनी जिल्ह्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं होतं.आज ते पालक सचिव आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यावर, इथल्या लोकांवर, वेंगुर्ल्यावर त्यांचं खूप प्रेम आहे आणि या प्रेमापोटीच कालच्या भेटीत त्यांनी सागर बंगल्यावर मुक्काम करायचं आणि तिथल्या काही गावांना भेटी देण्याचं ठरवलं.
परवाच्या आढावा बैठकीनंतर एकूणच सार्वजनिक बांधकाम विभाग हा सध्या चर्चेत आहे. पर्यटन विभाग पर्यटन महामंडळ काय आणि बांधकाम विभाग काय हे दोघे एकाच माळेचे मणी आहेत. आणि म्हणूनच ‘पब्लिक वर्स्ट डिपार्टमेंट’, ‘सार्वजनिक बदनाम खातं ‘ असा या खात्याचा अलिकडच्या काळात उल्लेख केला जातो.
टक्केवारीत गुंतलेल्या या खात्याकडे एखादं काम सोपवलं तर त्याचं सोनं होईल ही अपेक्षाच बाळगणं चूक आहे. म्हणूनच असं म्हटलं जातं बांधकाम खातं ज्याला हात लावतं,त्याचं सोनं कधीच होत नाही.
राजन चव्हाण : ८३९०००६१९१

Subscribe








