नवरात्रोत्सवानिमित्त चित्रकला व सुंदर हस्ताक्षर स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
केतन शिरोडकर /कुडाळ
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून कुडाळेश्वर उत्सव मंडळ आणि कुडाळेश्वर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळेश्वर मंदिरात विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व सुंदर हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कुडाळेश्वर महिला मंडळाच्या वतीने दीपप्रज्वलन करून चित्रकला स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. मंगलमय वातावरणात सुरू झालेल्या या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.
या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, तर इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत आपल्या कल्पकतेचे, सर्जनशीलतेचे आणि कलागुणांचे दर्शन घडविले.
चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर सुंदर चित्रे साकारत आपल्या कल्पनाशक्तीला रंग दिले. तर सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अक्षरांचे सौंदर्य, लेखनातील सुबकता आणि नीटनेटकेपणा यांवर भर दिला.
धार्मिक उत्सवाला सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांची जोड!
नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा आणि त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविणारा उत्सव ठरावा, या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित होत आहे. कुडाळेश्वर उत्सव मंडळ आणि कुडाळेश्वर महिला मंडळ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना आपले कौशल्य सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले.
या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राबविण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.


Subscribe








