पिंगुळीच्या पाझर तलावाच्या संरक्षणासाठी ग्रामस्थ आक्रमक.

२ नोव्हेंबरपासून प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा.

२७५ बंगल्यांच्या प्रकल्पावरून ग्रामस्थांमध्ये संताप.

केतन शिरोडकर / पिंगुळी

पिंगुळी गावाचा महत्त्वाचा जलस्रोत असलेल्या पाझर तलावाच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, तलावाशेजारी प्रस्तावित असलेल्या २७५ बंगल्यांच्या प्रकल्पावरून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या प्रकल्पामुळे तलावाच्या पाण्याची गुणवत्ता, पर्यावरण आणि परिसरातील नैसर्गिक संपत्तीला धोका निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या विविध मागण्यांसाठी येत्या सोमवार, २ नोव्हेंबर २०२६ पासून कुडाळ येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

पिंगुळी गावाच्या दृष्टीने पाझर तलावाला विशेष महत्त्व आहे. मात्र, तलावाच्या शेजारील जमीन बाहेरील व्यक्तींकडून संपादित करून तेथे तब्बल २७५ बंगल्यांचा मोठा प्रकल्प उभारण्याचे नियोजन सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या प्रकल्पामुळे तलावाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रस्तावित बांधकामातून निर्माण होणारे सांडपाणी, माती आणि इतर बांधकाम साहित्य तलावात जाण्याची शक्यता असून, त्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तसेच परिसरातील झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. याशिवाय तलावाशेजारील पारंपरिक रस्ता बंद करण्यात आल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या

पाझर तलावाचे संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थांनी काही महत्त्वाच्या मागण्या पुढे केल्या आहेत.
१. परिसरातील झाडांची बेसुमार कत्तल तातडीने थांबवावी.
२. प्रस्तावित प्रकल्पाला देण्यात आलेल्या सर्व परवानग्यांची पारदर्शक चौकशी करावी.
३. प्रकल्पामुळे होणाऱ्या पर्यावरणीय परिणामांचा सखोल अभ्यास करावा.
४. पाझर तलावातील पाण्याची गुणवत्ता आणि सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
५. तलावाशेजारील पारंपरिक रस्त्याबाबत निर्माण झालेल्या प्रश्नाची चौकशी करून योग्य तोडगा काढावा.

प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

पिंगुळीच्या पाझर तलावाचे संरक्षण व्हावे आणि ग्रामस्थांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जावी, अशी मागणी होत आहे. या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट करून संबंधित प्रकल्पाच्या परवानग्या, पर्यावरणीय बाबी आणि इतर तक्रारींची प्रशासनाने चौकशी करावी, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे.

या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास २ नोव्हेंबरपासून कुडाळ प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे आता प्रशासन या प्रश्नावर कोणती भूमिका घेते आणि ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत काय निर्णय होतो, याकडे पिंगुळीवासीयांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!