पिंगुळीत वादळी वाऱ्याचा तडाखा.

शिव वडापावच्या दुकानावर सुरूचे झाड कोसळले.

सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

वायमन गार्डन बसस्टॉपसमोरील सुरूचे झाड बांधकाम विभागाने तात्काळ हटवावे; ग्रामस्थांची मागणी.

केतन शिरोडकर /पिंगुळी

पिंगुळी-म्हापसेकर तिठा येथील एमआयडीसी नाक्याजवळ, दीपक गावडे यांच्या दुकानासमोरील शिव वडापावच्या दुकानावर परतीच्या पावसाच्या जोरदार वाऱ्यामुळे सुरूचे झाड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुकानात वडापाव खात असलेल्या शालेय विद्यार्थ्यांसह ग्राहकांची मोठी धावपळ उडाली. झाड कोसळल्याने विद्युत वाहिन्या तुटल्या, तर पिंगुळी-वेंगुर्ला मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

जोरदार वारा अन् अचानक कोसळले सुरूचे झाड!
पिंगुळी परिसरात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला. याचदरम्यान पिंगुळी-वेंगुर्ला मार्गालगत असलेले सुरूचे झाड अचानक तुटून शिव वडापावच्या दुकानावर आणि रस्त्यावर कोसळले.
सायंकाळची वेळ असल्याने शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, कामगार आणि नागरिकांची रस्त्यावर वर्दळ होती. शिव वडापावच्या दुकानात नेहमीप्रमाणे विद्यार्थी आणि ग्राहक वडापाव खात होते. अचानक झाड कोसळल्याने एकच गोंधळ उडाला. मात्र, प्रसंगावधान राखून विद्यार्थ्यांसह ग्राहकांनी तातडीने बाजूला धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण यांचा तत्पर पुढाकार.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण यांनी स्वतः जेसीबी चालवत रस्त्यावर कोसळलेले झाड बाजूला करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या तत्पर पुढाकारामुळे मदतकार्याला गती मिळाली.

दरम्यान, झाड कोसळल्याने विद्युत वाहिन्या तुटल्या. त्यामुळे महावितरणच्या पिंगुळी येथील कर्मचाऱ्यांनी आवश्यक कामकाज सुरू केले. कुडाळ पोलीस ठाण्याचे वाहतूक हवालदार श्यामसुंदर भगत यांनी घटनास्थळी दाखल होत वाहनचालकांना अडथळा होऊ नये, यासाठी वाहतुकीचे नियोजन केले. स्थानिक ग्रामस्थ, पोलीस पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही मदतकार्यात सहभाग घेतला. सर्वांच्या सहकार्याने रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न करण्यात आले.

वायमन गार्डन बसस्टॉपसमोरील धोकादायक सुरूचे झाड हटवण्याची मागणी.

पिंगुळी येथे सुरूचे झाड कोसळल्याच्या घटनेनंतर वायमन गार्डन बसस्टॉपसमोरील धोकादायक सुरूच्या झाडाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या बसस्टॉपवर विद्यार्थी, प्रवासी आणि ग्रामस्थांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी असलेले धोकादायक सुरूचे झाड भविष्यात मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकते, अशी भीती ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

शिव वडापावच्या दुकानावर झाड कोसळण्याच्या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. एखादी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची वाट न पाहता बांधकाम विभागाने वायमन गार्डन बसस्टॉपसमोरील धोकादायक सुरूचे झाड तात्काळ हटवावे, अशी जोरदार मागणी पिंगुळी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. संबंधित विभागाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन संभाव्य धोका दूर करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मदतकार्यात ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी,पदाधिकाऱ्यांचा सहभाग.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, पिंगुळी व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष दीपक गावडे, बाबल गावडे, प्रकाश गावडे, राजन पुरळकर, अजय परब, राजा परब, रोहन परब, केदार रासम, विपुल प्रभू, सचिन चव्हाण,सिद्धार्थ धुरी पोलीस पाटील सतीश माडये, शंकर सातार्डेकर, बाबली पिंगुळकर, यांच्यासह ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी मदतकार्यात सहभाग घेतला.

सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला, तरी वायमन गार्डन बसस्टॉपसमोरील धोकादायक सुरूचे झाड हटवून संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी बांधकाम विभागाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा पिंगुळी ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!