योगिता कानडे/केसरकर कुडाळ : तालुक्यातील तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. माधवी रुपेश कानडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसरपंच निवडीसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेत सौ. कानडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा केली.
ग्रामपंचायतीच्या विशेष सभेमध्ये ही संपूर्ण निवड प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि प्रशासकीय नियमांनुसार पार पडली. उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर होताच उपस्थित सदस्यांनी व ग्रामस्थांनी सौ. माधवी कानडे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
ही विशेष सभा तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. रामचंद्र सुभाष परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश रविंद्र कानडे यांची प्रमुख उपस्थिती होते.या सभेला ग्रामपंचायतीचे सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.
यामध्ये ग्रामपंचायत सदस्य श्री. महेंद्र मेस्त्री, श्री. गुणाजी जाधव, श्री. अजय डिचोलकर, श्री. संतोष डिचोलकर, सौ. धनश्री गवस, सौ. प्रणाली साटेलकर, सौ. रोहिणी हळदणकर तसेच श्रीमती गंधाली परब यांचा समावेश होता.
निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित उपसरपंच सौ. माधवी कानडे म्हणाल्या, “सरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामस्थांना विश्वासात घेऊन तेर्सेबांबर्डे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शासकीय लोककल्याणकारी योजना तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.”
सौ. माधवी कानडे यांच्या या निवडीबद्दल तेर्सेबांबर्डे गाव व परिसर तसेच विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


Subscribe







