कुडाळ : कुडाळ येथील विठ्ठलवाडी परिसरात पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाट, लायन्स क्लब कुडाळ आणि विठ्ठलवाडी येथील स्थानिक नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने एका नवीन बंधाऱ्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. या बंधाऱ्यामुळे परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून, नागरिकांना पाणीटंचाईपासून मोठा दिलासा मिळणार आहे.
या महत्त्वपूर्ण कामाच्या पूर्ततेप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रतिष्ठित नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी नगरसेवक मंदार शिरसाट, श्री. राणे, श्री. ताम्हणकर, सुलभा देसाई, श्री. आरोलकर, श्री. चऱ्हाटकर, किरण वारंग, मनोज जंगम, श्री. साळवी, श्री. तेंडुलकर तसेच विठ्ठलवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरसेवक मंदार शिरसाट यांनी यावेळी बोलताना सांगितले की, विठ्ठलवाडी परिसरातील पाण्याचा प्रश्न सोडवणे ही आमची प्राथमिकता होती. लायन्स क्लब कुडाळ आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या बहुमूल्य सहकार्यामुळेच हे काम वेळेत पूर्ण करणे शक्य झाले.
स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत, नगरसेवक मंदार शिरसाट आणि लायन्स क्लबचे विशेष आभार मानले आहेत. सामाजिक बांधिलकी आणि सामूहिक प्रयत्नांतून उभा राहिलेला हा बंधारा विठ्ठलवाडीच्या विकासात मोलाचे योगदान देईल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.


Subscribe








