विद्यार्थ्यांनी उभारला वनराई बंधारा; जि.प. उपाध्यक्ष दादा साईल यांचा पाणी बचतीचा संदेश

जलसंधारणाची चळवळ शाळेपासून गावापर्यंत पोहोचविण्याचा विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

ओरोस : दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणी बचत व जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जि.प. प्राथमिक शाळा ओरोस बु. नं.०१ येथील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत ओरोस दत्तमंदिर येथे वनराई बंधारा उभारला. या उपक्रमात जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी सहभागी होत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला आणि त्यांच्याशी संवाद साधत पाणी बचतीचे महत्त्व पटवून दिले.

पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता ते अडविणे व जमिनीत जिरविणे ही काळाची गरज आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे केवळ प्रशासनाच्या माध्यमातून न होता लोकसहभागातून व्यापक चळवळ उभी राहणे आवश्यक आहे, असे दादा साईल यांनी यावेळी सांगितले.

विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष श्रमदानातून वनराई बंधारा उभारून “पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी वाचवा” हा संदेश कृतीतून दिला. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच पर्यावरण व जलसंधारणाबाबत जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे दादा साईल यांनी नमूद केले.

यावेळी माजी जि.प. अध्यक्ष तथा जि.प. सदस्य दीपलक्ष्मी पडते, जि.प. सदस्य सुप्रिया वालावलकर, उपसरपंच पांडू मालवणकर, शिवसेना शाखाप्रमुख मदन परब, नागेश ओरोसकर, अनुष्का ओरोसकर, हर्षदा पाटणकर, मुख्याध्यापक राज पवार, पपू सावंत, कुलूवंत वारंग यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचावा आणि प्रत्येक गावाने पाणी बचतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी माजी जि.प.अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते यांनी केले. यावेळी उपस्थित सर्वांचे आभार मुख्याध्यापक राज पवार यांनी मानले…

error: Content is protected !!