विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्कूल बसकरिता ११,५०१ रुपयांची देणगी; माजी विद्यार्थ्यांनाही सहकार्याचे आवाहन
चेंदवण : श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे सरस्वती पूजन या पवित्र कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या माजी मुख्याध्यापिका नार्वेकर मॅडम यांनी सदिच्छा भेट देत शाळेच्या प्रगतीची माहिती जाणून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करताना होणारी गैरसोय लक्षात घेऊन स्कूल बसची आवश्यकता असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत नार्वेकर मॅडम यांनी स्कूल बस निधी साठी रोख रू.११,५०१ रुपयांची देणगी देऊन स्कूल-बस निधी संकलन योजनेचा शुभारंभ केला. नार्वेकर मॅडम यांनी आपल्या सेवाकाळात विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून विशेष ओळख निर्माण केली होती. विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते, शिक्षणाप्रती असलेली तळमळ आणि शाळेच्या प्रगतीविषयीची आस्था यांमुळे त्या विद्यार्थी व सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय होत्या. सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही शाळेशी असलेले आपले नाते त्यांनी जपले असून, सरस्वती पूजनाच्या निमित्ताने दिलेली ही देणगी त्यांच्या शाळेविषयीच्या प्रेमाची आणि आत्मीयतेची प्रचिती देणारी ठरली.
विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय दूर व्हावी आणि त्यांना सुरक्षित व सुलभ वाहतुकीची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने स्कूल बस उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी नार्वेकर मॅडम यांनी माजी विद्यार्थ्यांनाही सहकार्य करण्याचे आवाहन केले. माजी विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी समीर शृंगारे यांनीही माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य केल्यास लवकरच शाळेसाठी स्कूल बस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सांगितले.
नार्वेकर मॅडम यांच्या या सदिच्छा भेटी निमिताने शाळा समितीचे अध्यक्ष देवेंद्रजी नाईक यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक माणिक पवार, शिक्षकवृंद व पालक उपस्थित होते.
शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षणप्रेमींनी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. नार्वेकर मॅडम यांनी शुभारंभ केलेल्या या स्कूल-बस निधी संकलन योजनेस अल्पकालावधित भरघोस प्रतिसाद लाभत आहे. त्यांच्या या प्रेरणादायी योगदानाबद्दल शाळेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.


Subscribe








