कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहरातील भंगसाळ नदीवरील बंधाऱ्यावरून दुचाकी नदीपात्रात कोसळून आई आणि मुलगा जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली. दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत दोघेही पाण्यात पडले. मात्र, शेलटेवाडीतील ग्रामस्थांनी वेळीच मदत केल्याने दोघांचेही प्राण वाचले. जखमी मायलेकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हॉटेल गुलमोहोरजवळील भंगसाळ बंधाऱ्यावर लघु पाटबंधारे विभागाकडून पाणी साठवण्यासाठी लोखंडी प्लेट्स बसवण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी आणलेल्या प्लेट्स बंधाऱ्यावर ठेवण्यात आल्या होत्या. याच परिसरातून दुचाकी जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकी थेट नदीपात्रात कोसळली. दुचाकीवरील आई आणि मुलगाही पाण्यात पडले.
घटनेचा आवाज आणि परिस्थिती लक्षात येताच शेलटेवाडीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ बचावकार्य करत पाण्यात पडलेल्या दोघांना बाहेर काढले. दोघांना दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. नदीपात्रात पडलेली दुचाकीही बाहेर काढण्यात आली.
बंधाऱ्यावर सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना होत्या का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.


Subscribe







