योगिता कानडे/कुडाळ : गेल्या काही महिन्यांपासून पावसाने मारलेल्या ओढीमुळे आधीच शेतकरी दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करत होते. पाण्याच्या तुटवड्यामुळे पिकवलेले पीक कसेबसे वाचवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, आज सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे परिसरातील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या दुहेरी संकटामुळे स्थानिक शेतकरी पुरता कोलमडला असून हाती आलेला तोंडाचा घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.
परिसरात अनेक ठिकाणी भात पिकाची कापणी सुरू होती, तर काही ठिकाणी पिके कापून शेतातच वाळवण्यासाठी ठेवली होती. मात्र, अचानक आलेला पाऊस आणि वाऱ्यामुळे कापणीस आलेले भात पीक जमिनीवर पसरले. काही ठिकाणी शेतात साचलेल्या पाण्यात कापलेले भात भिजल्यामुळे धान्याला मोड येण्याची आणि पीक कुजण्याची भीती निर्माण झाली आहे.
आधीच वेळेवर पाऊस न पडल्यामुळे विहिरीच्या जिवावर पीक जगवले होते. आता पीक काढणीच्या वेळीच अवकाळी पावसाने घात केला. संपूर्ण मेहनत आणि लावलेला खर्च पाण्यात गेला आहे .