श्री रायकर मित्र मंडळाचा पुढाकार.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी भूजल पातळी वाढविण्याचा प्रयत्न.
केतन शिरोडकर / पिंगुळी
भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने पिंगुळी येथील धुरी टेंब नगरमध्ये श्री रायकर मित्र मंडळाच्या पुढाकारातून वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थांनी एकत्र येत लोकसहभागातून हा उपक्रम राबविला.
पाणी ही प्रत्येकाची मूलभूत गरज असून, भविष्यात उन्हाळ्यात उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेता पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे आवश्यक आहे. याच विचारातून श्री रायकर मित्र मंडळाने वनराई बंधारा उभारण्याचा उपक्रम हाती घेतला. या बंधाऱ्यामुळे पाण्याचा अपव्यय रोखण्यासोबतच भूजल पातळी वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या उपक्रमात श्री रायकर मित्र मंडळाचे अध्यक्ष रुपेश धुरी, सचिव विनय धुरी, खजिनदार विनय येरम यांच्यासह शुभम धुरी, गोविंद धुरी, निलेश धुरी, गिरीधर धुरी, शंकर धुरी, राजाराम धुरी, गणेश धुरी, विराज धुरी, श्रीराम धुरी, अनिल धुरी, अक्षय धुरी, तुषार धुरी, अनंत धुरी, भरत धुरी, वैभव धुरी, नितीन धुरी, सुनील जाधव, संदीप वारंग, प्रकाश जाधव आणि जयवंत वारंग यांनी सहभाग घेतला. तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ. ज्योती जाधव यांचेही सहकार्य लाभले.
लोकसहभागातून जलसंवर्धनाचा आदर्श
पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी केवळ शासकीय यंत्रणांवर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी एकत्र येऊन असे उपक्रम राबविणे ही काळाची गरज आहे. श्री रायकर मित्र मंडळ आणि ग्रामस्थांनी एकजुटीने केलेला हा प्रयत्न जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे. अशा लोकसहभागातून उभारल्या जाणाऱ्या बंधाऱ्यांमुळे पाणी अडविणे, पाणी जमिनीत जिरविणे आणि भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी निश्चितच हातभार लागू शकतो.
धुरी टेंब नगरमधील या उपक्रमातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश देत ग्रामस्थांनी जलसंवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.


Subscribe







