पिंगुळीच्या लोककलेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

बाळकृष्ण मसगे यांना ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ राष्ट्रीय युवा पुरस्कार’ प्रदान.

केतन शिरोडकर / पिंगुळी

पिंगुळीच्या पारंपरिक लोककलेला राष्ट्रीय स्तरावर मानाची मोहोर! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी गावचे युवा लोककलाकार श्री. बाळकृष्ण गणपत मसगे यांना प्रतिष्ठेचा ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ राष्ट्रीय युवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

पिंगुळी गावाला समृद्ध लोककलेची परंपरा लाभली असून, येथील पारंपरिक कळसूत्री बाहुल्यांची कला ही कोकणच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख आहे. या कलेच्या जतनासाठी आणि संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या बाळकृष्ण मसगे यांना राष्ट्रीय स्तरावर पुरस्काराने गौरविण्यात आल्याने पिंगुळीच्या सांस्कृतिक परंपरेची देशपातळीवर दखल घेतली गेली आहे.

पारंपरिक लोककलेचा वारसा जपत तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य लोककलाकारांकडून केले जात आहे. अशा वेळी मसगे यांना मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान पिंगुळीच्या लोककलाविश्वासाठी अभिमानास्पद ठरणारा आहे. त्यांच्या या यशामुळे पिंगुळीच्या कळसूत्री बाहुल्यांच्या कलेसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली आहे.

बाळकृष्ण मसगे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पिंगुळीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या राष्ट्रीय सन्मानामुळे कोकणच्या लोककलेला नवी ओळख मिळाली आहे.

error: Content is protected !!