कुडाळमध्ये दुर्गामाता दौडीतून शौर्य, भक्ती आणि धर्मजागृतीचा जागर.

लाठीकाठी, तलवारबाजी अन् दांडपट्ट्याच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थित मंत्रमुग्ध; १६ कर्तबगार महिलांचा सन्मान

केतन शिरोडकर /कुडाळ.

शौर्य, भक्ती, शक्ती आणि धर्मजागृतीचा संदेश देत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व शिवप्रेमी संघटना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या दुर्गामाता दौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या दौडीदरम्यान कणकवली-बिडवाडी येथील महिलांनी सादर केलेल्या लाठीकाठी, तलवारबाजी आणि दांडपट्ट्याच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी ‘स्त्री शक्ती उद्योगिनी महाराष्ट्राची सन्मान सोहळा २०२६’ अंतर्गत गौरविण्यात आलेल्या १६ कर्तबगार महिलांचाही सहभाग होता.

दुर्गामाता दौडीचा प्रारंभ आई केळबाई मंदिर येथून करण्यात आला. कुडाळ बाजारपेठ, शिवाजीनगरमार्गे जिजामाता चौकापर्यंत ही दौड काढण्यात आली. दौडीच्या मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढून स्वागत करण्यात आले. भगवे ध्वज, शिवभक्तांचा उत्साह आणि पारंपरिक युद्धकलांच्या प्रात्यक्षिकांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी बोलताना शिवप्रेमी सदस्य उन्मेषा दाभोलकर म्हणाल्या की, दुर्गामाता दौड ही केवळ धावण्याची दौड नसून तरुण पिढीमध्ये भक्ती, शक्ती, सुसंस्कार आणि धर्मजागृती निर्माण करणारे प्रभावी माध्यम आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासातील शौर्य, पराक्रम आणि विचारांची प्रेरणा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

महिलांनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेणे काळाची गरज!
आजच्या संगणक युगात महिलांनी स्वसंरक्षणासाठी लाठीकाठी आणि तलवारबाजी यांसारख्या पारंपरिक युद्धकलांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. महिलांचे सक्षमीकरण, सबलीकरण आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे दाभोलकर यांनी नमूद केले.

महिला ही कुटुंब आणि समाजाच्या विकासाचा आधार असून, तिने स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होणेही गरजेचे आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत महिलांना घरबसल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. शिवणकाम हा घरबसल्या सन्मानाने उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय असून, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष उपक्रम हाती घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

भारत सरकार प्रणित महिला उद्योजकता विकास अभियान, सेवाभावी संस्था प्रबोधन समिती, संजीवन उद्योग समूह आणि आश्रय प्रतिष्ठान, कुडाळ एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नाशिकच्या संस्थापक-अध्यक्षा डॉ. सुनीता मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना संघटित करून त्यांना स्वावलंबी बनविण्याचे कार्य सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘घरबसल्या शिवणकाम, सन्मानाने कमवा’ आणि ‘गाव तिथे रोजगार’ या संकल्पनांच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. या अभियानात सहभागी होण्याचे आवाहनही दाभोलकर यांनी केले.

या कार्यक्रमाला मनोज वालावलकर, ज्येष्ठ महिला उद्योजिका रेश्मा जळवी, विवेक पंडित, रमाकांत नाईक, शिवम म्हाडेश्वर, स्वाती पेडणेकर, मृणाल सावंत, अंजली वालावलकर, रेवती राणे, धारकरी गोपाळ भिसे, स्वरूप वाळके, अदिती सावंत, कीर्ती पाटील, पूजा कुडव, सानिका सावंत, स्वप्नाली जळवी, दर्शना धुरी, दर्शना मार्गी, प्रियांका सुकाळे, वृंदा राऊत, रोहिणी घाडी, पद्मा वेंगुर्लेकर, आनंद वेंगुर्लेकर यांच्यासह शिवप्रेमी, महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुर्गामाता दौडीच्या माध्यमातून शौर्य, संस्कार, महिला सक्षमीकरण आणि लोकजागृतीचा संदेश देण्यात आला.

error: Content is protected !!