कडावल महापुरुष मंदिर येथे श्रद्धांजली सभा संपन्न
सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेणार भेट
कडावल : महाराष्ट्रातील सर्वात शांत जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसाढवळ्या एका युवतीचा निर्घृण खून होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना असून या घटनेविरोधात सर्वांनी एकत्र येत लढा दिला पाहिजे असा निर्धार कडावल पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केला. वर्दे गावातील २३ वर्षीय दामिनी किरण पालव हिची शनिवारी सायंकाळच्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली. यासाठीची न्याय व श्रद्धांजली सभा कडावल येथील महापुरुष मंदिरात संपन्न झाली. यावेळी मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
ऐन नवरात्रीच्या दिवसांमध्ये ज्या मुलीला आपण देवीचे रूप मानतो अशा मुलीची निर्घृण हत्या होणे दुर्दैवी असून अशा प्रवृत्तीच्या विरोधात एकत्रित येत अशी प्रवृत्ती जागीच ठेचून काढली पाहिजे. यासाठी सर्वांनी पक्ष आणि राजकारण बाजूला ठेवून एकत्र यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
लहानपणापासूनच मोबाईल आणि सोशल मिडीयाचा अतिवापर यांमुळे अशा घडत असून पालकांनी देखील वेळोवेळी आपल्या मुलांच्या मोबाईलची हिस्ट्री चेक करावी असे सांगण्यात आले. तसेच दामिनीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.
यावेळी किनळोस, आवळेगाव, कडावल, निरुखे, पांग्रड, भडगाव, वर्दे गावातील ग्रामस्थ, सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Subscribe








