सिंधुदुर्गातील कामगारांच्या लढ्याला यश!

कोकणकन्या एक्स्प्रेसचा वेरणा स्थानकावरील थांबा अखेर मंजूर

गोव्यातील वेरणा औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा; कामगारांच्या एकजुटीचा विजय

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असंख्य तरुण-तरुणी रोजगारासाठी गोवा राज्यातील विविध औद्योगिक वसाहतींमध्ये कामाला जातात. वाढती महागाई, राहण्याचा खर्च आणि घरभाड्याचा वाढता बोजा यामुळे अनेक कामगार दररोज रेल्वेने प्रवास करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा कामगारांसाठी महत्त्वाची असलेल्या कोकणकन्या एक्स्प्रेसला गोव्यातील वेरणा रेल्वे स्थानकावर थांबा मिळण्याची मागणी अखेर मार्गी लागली आहे. गाडीचा अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशांचा थांबा मंजूर झाल्याने सिंधुदुर्गातील कामगारवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

वेरणा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये (GIDC) सिंधुदुर्गातील अनेक कामगार नोकरीसाठी जातात. यापूर्वी कोकणकन्या एक्स्प्रेसला वेरणा स्थानकावर थांबा उपलब्ध असल्याने कामगारांना प्रवासासाठी मोठी सोय होत होती. मात्र, हा थांबा बंद झाल्यानंतर कामगारांना ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे हा थांबा पुन्हा सुरू करण्यासाठी कामगारांनी एकजूट दाखवत रेल्वे प्रशासनाकडे निवेदन सादर केले होते.

या मागणीसाठी कामगारवर्गाने सातत्याने पाठपुरावा केला. रेल्वे कर्मचारी संघटनेनेही या प्रयत्नांना महत्त्वपूर्ण सहकार्य केले. अखेर कोकणकन्या एक्स्प्रेसच्या वेरणा स्थानकावरील अप आणि डाऊन थांब्याला मंजुरी मिळाल्याने कामगारांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

या लढ्यात शिवराम खानोलकर, ओंकार पाटणकर, आशिष मेस्त्री, आदेश सावंत, मंदार पार्सेकर यांच्यासह अनेक कामगारांनी सहभाग घेतला. तसेच अनेक तरुण-तरुणी आणि नोकरदारांनी स्वाक्षऱ्यांद्वारे या मागणीला पाठिंबा दिला. सर्व सहकार्य करणाऱ्या कामगारांचे ओंकार पाटणकर यांनी आभार मानले.

कामगारांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कामगारांची एकजूट, संघटित प्रयत्न आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यांच्या बळावर हा प्रश्न मार्गी लागल्याने सिंधुदुर्गातील चाकरमान्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

error: Content is protected !!