वार्षिक स्नेहसंमेलन, बक्षीस वितरण व दशावतारी नाट्यप्रयोग उत्साहात संपन्न
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, दाभोली नं. १ येथे ‘शारदोत्सव २०२६’ निमित्त आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा शनिवारी (दि. १७ ऑक्टोबर) अत्यंत उत्साही आणि आनंददायी वातावरणात पार पडला. याप्रसंगी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाला पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. या सोहळ्याला प्राध्यापक डॉ. श्रीधर पेडणेकर, जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. विजयजी नाईक, पंचायत समिती सदस्य मा. श्री. नितीन मांजरेकर, माजी पंचायत समिती सदस्य मा. श्री. समाधान बांदवलकर, पंचायत समिती सदस्य मा. श्रीम. शितल राऊत, उपसरपंच मा. श्री. कृष्णा बांदवलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. योगिता गोलतकर, ग्रामविकास अधिकारी मा. श्री. कृष्णा पेडणेकर आणि शिक्षणतज्ज्ञ श्री. केतन प्रभू खानोलकर आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
उद्घाटन सत्रामध्ये वर्षभरात विविध शैक्षणिक, क्रीडा व सहशालेय उपक्रमांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन विशेष गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणाने जिंकली मने
सायंकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. बालगोपाल विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य यांसारख्या विविध कलाप्रकारांतून उपस्थितांची मनमोहित केली. या सांस्कृतिक सत्राचे मुख्य आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांनी सादर केलेला ‘दशावतारी नाट्यप्रयोग’. लहानग्यांच्या या प्रभावी आणि उत्स्फूर्त अभिनयाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजर करत भरभरून दाद दिली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या आणि त्यांच्या यशाचा गौरव करणाऱ्या या सोहळ्यामुळे संपूर्ण शालेय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. दाभोली ग्रामस्थ व पालकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले असून शाळेच्या या यशस्वी आयोजनाचे सर्वत्र स्वागत होत आहे.


Subscribe







