महिलांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण शिबिराचे कुडाळमध्ये आयोजन.

कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि आश्रय प्रतिष्ठानचा संयुक्त उपक्रम.

फॅब्रिक पेंटिंगसह विविध कलाकुसरींचे मिळणार प्रशिक्षण

कुडाळ : महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नाशिक आणि आश्रय प्रतिष्ठान, कुडाळ एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २१ व २२ ऑक्टोबर रोजी शिवाजीनगर, कुडाळ येथील दैवज्ञ समाज भवन येथे होणार आहे.

या प्रशिक्षण शिबिरात नाशिक येथील फाइन आर्टिस्ट आणि क्राफ्ट ट्रेनर श्रीमती नंदिनी रामचंदानी मार्गदर्शन करणार आहेत. महिलांना विविध कलाकौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या शिबिरात फॅब्रिक पेंटिंग प्रशिक्षणांतर्गत कापडासाठी योग्य रंगांची निवड, ब्रशचा वापर, विविध चित्रकला तंत्रे, फुलांची पारंपरिक व आधुनिक डिझाइन्स, स्टेन्सिल तंत्र, रंगांचे मिश्रण, शेडिंग तसेच कापडावरील रंग दीर्घकाळ टिकण्यासाठी आवश्यक पद्धतींचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

याशिवाय रेझिन ट्रे, कोस्टर, कीचेन, फोटो फ्रेम आणि आरती थाळी तयार करणे, पिलर व स्तंभाकार मेणबत्त्या, फॅन्सी दिवे, लाडू मेणबत्त्या आणि सुगंधी जार मेणबत्त्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच पिलो बॉक्स, स्लाइडिंग बॉक्स, पेपर बॉक्स, ड्रॉवर बॉक्स, षटकोनी बॉक्स, विंडो बॉक्स, कागदी पिशव्या आणि लिफाफे तयार करण्याच्या विविध पद्धतींचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे.

हे प्रशिक्षण शिबिर दोन्ही दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत आयोजित करण्यात आले असून, प्रशिक्षणाचे वेळापत्रक संबंधित अभ्यासक्रमानुसार असेल.
या रोजगाराभिमुख प्रशिक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलांनी अधिक माहितीसाठी आश्रय प्रतिष्ठानचे माधव गोरे, मणिकर्णिकाच्या उन्मेषा दाभोलकर आणि सतीश पाथरूड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!