Sindhudurg Murder Case | वर्देतील दामिनी पालव हत्या प्रकरणाचा उलगडा

वर्दे येथील दामिनी पालव हत्या प्रकरणात साईल विश्राम धुरीला वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सिंधुदुर्ग पोलिसांच्या तपासाला वेग.

संशयित आरोपी साईल धुरीला मठ येथून ताब्यात!

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या वर्दे येथील महाविद्यालयीन युवती दामिनी किरण पालव हत्या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहे. साईल विश्राम धुरी असे त्याचे नाव असून, वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथील घरातून रात्री १२ च्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

कुडाळ तालुक्यातील वर्दे येथे शनिवारी सायंकाळी दामिनी पालव या तरुणीची धारदार चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर आरोपी फरार झाल्याने वर्दे गावासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग देण्यात आला.

फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सहा पथके तैनात केली होती. तसेच महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून विविध दिशांनी शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर मठ येथून संशयित आरोपीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. या हत्येमागील नेमके कारण काय, गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का आणि घटनेच्या वेळी नेमके काय घडले, याचा उलगडा आता पुढील पोलीस तपासातून होण्याची शक्यता आहे.

दामिनी पालव हत्या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पोलिसांकडून आरोपीची चौकशी करून या प्रकरणातील सर्व बाबी स्पष्ट केल्या जाण्याची अपेक्षा आहे.

error: Content is protected !!