आरोपी फरार, जिल्हाभर नाकाबंदी
“आई, वडापाव घेऊन येऊ का?” दामिनीचा शेवटचा फोन; कुडाळमधील हत्येने जिल्हा हादरला!
कुडाळ : आईशी फोनवर बोलताना घरी येताना वडापाव घेऊन येऊ का, अशी साधी विचारणा करणाऱ्या दामिनी पालव हिचा काही वेळातच दुर्दैवी अंत झाल्याची घटना समोर आली आहे. कुडाळ तालुक्यातील वर्दे गावातील या तरुणीचा कडावल परिसरात धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शिक्षण पूर्ण करून करिअरची नवी सुरुवात करण्याच्या तयारीत असलेल्या दामिनीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नोकरीसाठी मुंबईला जाण्याची तयारी
दामिनी किरण पालव ही वर्दे गावातील खालची पालववाडी येथील रहिवासी होती. तिचे वडील शेती करतात. दामिनीने कुडाळ येथील वर्देकर पाटकर महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले होते. येत्या दोन दिवसांत नोकरीच्या मुलाखतीसाठी मुंबईला जाण्याची तिची तयारी सुरू होती. स्वतःच्या पायावर उभे राहून कुटुंबाला हातभार लावण्याची स्वप्ने ती पाहत होती. मात्र, करिअरच्या उंबरठ्यावर असतानाच तिच्यावर काळाने घाला घातल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
बसथांब्यावर उतरली अन् आईला केला फोन
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास दामिनी कडावल येथील बसथांब्यावर उतरली. त्यानंतर तिने आईशी फोनवर संपर्क साधला. घरी येताना वडापाव घेऊन येऊ का, अशी विचारणा तिने केली होती. हा आई-मुलीमधील नेहमीसारखा संवाद होता. मात्र, त्यानंतर अवघ्या काही वेळात दामिनीचा मोबाईल बंद झाल्याची माहिती समोर आली. घराकडे पायी निघालेल्या दामिनीसोबत पुढे नेमके काय घडले, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.
मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर मृतदेह
कडावलहून वर्देच्या दिशेने जाताना मुख्य रस्त्यापासून सुमारे ५० मीटर अंतरावर असलेल्या व्हाळाजवळ दामिनीवर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तिच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आढळल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळापासून घराचे अंतर सुमारे दोन किलोमीटर असल्याने ती घराकडे जात असताना नेमकी कोणत्या परिस्थितीत ही घटना घडली, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
काळ्या शर्टातील तरुणाबाबत माहिती
घटनास्थळाजवळ असलेल्या एका मुलाला व्हाळाच्या दिशेने संशयास्पद आवाज ऐकू आल्याची माहिती समोर आली आहे. त्याच सुमारास काळा शर्ट घातलेला एक अनोळखी तरुण तेथून वर येऊन एमएच-०७ क्रमांकाची स्प्लेंडर दुचाकी घेऊन निघून गेल्याचे सांगितले जात आहे. या माहितीची सत्यता आणि संबंधित व्यक्तीचा या गुन्ह्याशी काही संबंध आहे का, हे पोलीस तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे.
यानंतर घटनास्थळाच्या दिशेने जाऊन पाहणी करण्यात आली असता दामिनी मृतावस्थेत आढळली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा आणि पुढील तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी ओरोस येथील रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती आहे.
हत्येमागील कारणाचा शोध सुरू
दामिनीच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिच्या संपर्कातील व्यक्ती, शेवटच्या फोन संभाषणाशी संबंधित माहिती, घटनास्थळाजवळील हालचाली आणि उपलब्ध पुरावे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकतात. संशयिताची ओळख पटवणे आणि हत्येमागील हेतू उघड करणे हे पोलिसांसमोरील प्रमुख आव्हान आहे.
उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणीचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने वर्दे आणि कडावल परिसरात भीती व हळहळ व्यक्त होत आहे. दामिनीच्या हत्येचे गूढ उकलून आरोपीला अटक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या प्रकरणातील अधिकृत तपासातूनच घटनेचे नेमके स्वरूप आणि हत्येमागील कारण स्पष्ट होणार आहे.




Subscribe








