गवारेड्याच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी

डिगस तलावाजवळील घटना

कुडाळ : गवारेड्याच्या हल्ल्यात युवक जखमी झाल्याची घटना गुरुवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. प्रसाद सत्यवान तेरसे असे त्याचे नाव असून तो निरुखे गावचा रहिवासी आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास प्रसाद तेरसे हा युवक आपल्या ताब्यातील दुचाकीवरून कुडाळहून निरुखेच्या दिशेने जात होता. यावेळी डिगस तलावाजवळ आला असता गवारेड्याने दुचाकीला अचानक धडक दिली. यावेळी दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी रस्त्यावर कोसळून झालेल्या अपघातात त्याच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने याबाबतची माहिती वनविभागाला देत जखमी युवकाला उपचारासाठी रुग्णालयात हलवले.

गवारेड्याच्या मानवी वस्तीतील वाढत्या वावरामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. शिवाय या गवारेड्यांनी शेतीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. अशातच काल घडलेल्या घटनेनंतर ग्रामस्थ दहशतीखाली वावरत आहेत. अनेकदा निरुखे, पांग्रड, घोटगे, भडगाव येथील ग्रामस्थ कुडाळ किंवा ओरोस येथे जाण्यासाठी याच मार्गाचा अवलंब करतात. रात्री – अपरात्री या मार्गाने दुचाकीवरून जात असताना त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर या गवारेड्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी होत आहे.

error: Content is protected !!