कुडाळ : भ्रष्टाचाराला प्रतिबंध घालणे, प्रामाणिकपणा व पारदर्शकतेची मूल्ये रुजवणे आणि नागरिकांमध्ये दक्षतेबाबत जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने बँक ऑफ इंडिया, पाट शाखेच्या वतीने पाट-परबवाडा ग्रामपंचायतीमध्ये २२ सप्टेंबर २०२६ रोजी दक्षता जागरूकता अभियान आयोजित करण्यात आले. या अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या दक्षता जागरूकता उपक्रमांचा मुख्य उद्देश भ्रष्टाचारमुक्त कारभार, प्रामाणिकपणा, उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेला प्रोत्साहन देणे हा आहे. या उपक्रमांतून नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधात जागरूक राहण्याचे तसेच उपलब्ध तक्रार निवारण यंत्रणांची माहिती घेण्याचे महत्त्व पटवून दिले जाते.
बँकिंग क्षेत्रात आर्थिक व्यवहार करताना सतर्कता बाळगणे, डिजिटल व्यवहार सुरक्षितपणे करणे, गोपनीय बँकिंग माहिती सुरक्षित ठेवणे आणि संशयास्पद व्यवहारांबाबत योग्य ती खबरदारी घेणे याविषयी जनजागृती करणेही अशा अभियानांचा महत्त्वाचा भाग आहे.
या कार्यक्रमाला बँक ऑफ इंडिया, पाट शाखेचे शाखा व्यवस्थापक श्रीविन पोडुवल तसेच पाट-परबवाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच साधना समाधान परब यांची उपस्थिती होती. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि जागरूक नागरिकत्व ही मूल्ये समाजात रुजविण्यासाठी अशा जनजागृतीपर उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.


Subscribe







