सेवा शक्ती संघर्ष संघटनेची ६ नोव्हेंबरपासून संपाची नोटीस
विविध मागण्यांसाठी करणार संप
ऐन दिवाळी सण उत्सवाच्या दिवसात गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांच्या प्रवासात विघ्न येण्याची चिन्हे आहेत. वेतनवाढ व बोनससह इतर प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने ६ नोव्हेंबर पासून राज्यव्यापी संप पुकारण्याची महामंडळाला नोटीस दिली आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभीम पाखरे यांनी दिली. राज्यात दररोज ५० ते ६० लाख तर सोलापूर जिल्ह्यातील रोज सुमारे १ लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात.
एसटीचे एकूण ५ हजाराहून अधिक कर्मचारी आहेत. भाजप नेते गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील या संघटनेचे १७५० सदस्य आहेत. या संघटनेचे आंदोलन झाल्यास या प्रवाशांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
महामंडळात नवीन चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांची पुरेशी भरती होत नसल्याने बससेवेवर व गाड्यांच्या दुरुस्तीवर परिणाम होत आहे. अपुऱ्या तांत्रिक कौशल्यामुळे रस्त्यात गाड्या बंद पडण्याचे (ब्रेकडाऊन) प्रमाण वाढले असून, प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे. याकडे लक्ष वेधतानाच महिला सन्मान योजने अंतर्गत एनसीएमसी कार्डची सक्ती न करता ईटीआयएम मशीनद्वारे पूर्वीप्रमाणे रोख तिकीट देण्याचा पर्याय उपलब्ध करावा, अशी मागणीही संघटनेकडून करण्यात आली आहे.
या आहेत प्रमुख मागण्या
वेतन आणि बोनसः सातव्या वेतन आयोगानुसार २०२४ ते २०२८ चा नवीन वेतन करार करावा, दरमहा ७ तारखेला निश्चित पगार व्हावा आणि दिवाळीसाठी १५,००० रुपये बोनस देण्यात यावा.
महागाई भत्ता व फरक : कर्मचाऱ्यांना २ टक्के वाढीव महागाई भत्ता देऊन तो ६० टक्के करावा आणि २०१६ पासूनचा थकित महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वेतनवाढीचा फरक एकरकमी द्यावा.
कंत्राटी भरती बंद : खासगी चालकांची कंत्राटी भरती तत्काळ बंद करून २०१९ मधील पात्र उमेदवारांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे. तोट्यात चालणाऱ्या खासगी इलेक्ट्रिक बसेसचा करार रद्द करावा.
वैद्यकीय सुविधा व निवृत्तांची देणी : कर्मचाऱ्यांसाठी तत्काळ कॅशलेस मेडिकल योजना सुरू करावी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची सर्व थकीत देणी त्वरित द्यावीत.
परिवहन मंत्र्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना ५८ टक्के महागाई भत्ता, १०, २० आणि ३० टक्के घरभाडे भत्ता तसेच तीन टक्के वार्षिक वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार दोन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करून त्याची थकबाकी ऑक्टोबरच्या वेतनासोबत द्यावी. ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळी सुरू होण्यापूर्वी खात्यात जमा करावे. तसेच २५ हजार रुपये दिवाळी भेट द्यावी,’ अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.


Subscribe








