शिक्षणप्रेमी पालक श्री. रुपेश जाधव यांच्या आर्थिक सहकार्यातून उपक्रम; इयत्ता चौथी व सातवीतील विद्यार्थ्यांचा गौरव
देवगड : विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी करता यावी, त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण व्हावी आणि शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने वाडा केंद्रस्तरीय इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले. शिक्षणप्रेमी पालक श्री. रुपेश जाधव यांच्या आर्थिक सहकार्यातून आयोजित या उपक्रमाला वाडा केंद्रातील शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परीक्षेनंतर दोन्ही गटांतील प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
सदर परीक्षेचे प्रश्नपत्रिका निर्मिती व परीक्षेचे संपूर्ण काम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडा मुळबांधचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री. नवनाथ चौगले सर यांनी केले. वाडा केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ. ब्रह्मदंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
या उपक्रमाला पंचायत समिती देवगड शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी माननीय श्री मुकुंद शिनगारे साहेब तसेच पडेल प्रभागाचे विस्तार अधिकारी माननीय श्री. श्रीरंग काळे साहेब यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे तसेच केंद्रातील शिक्षकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर सरावाची चांगली संधी उपलब्ध झाली.
इयत्ता चौथीतील गुणवंत विद्यार्थी
१. सिद्धी प्रवीण सुतार — शाळा : पुरळ कसबा — १७४ गुण — प्रथम क्रमांक
२. पूर्वी सत्यवान वारीक — शाळा : नाडण नंबर १ — १६८ गुण — द्वितीय क्रमांक
३. विहान शैलेश घाडी — शाळा : नाडण नंबर १ — १६० गुण — तृतीय क्रमांक
इयत्ता सातवीतील गुणवंत विद्यार्थी
१. मयंक विजय मुळम — शाळा : पुरळ कलंबई — १४४ गुण — प्रथम क्रमांक
२. विघ्नेश संतोष राऊळ — शाळा : फणसे — १४२ गुण — द्वितीय क्रमांक
३. हर्तिक विनोद थोटम — शाळा : फणसे — १३८ गुण — तृतीय क्रमांक
3 रितिका आनंद राणे — शाळा : फणसे — १३८ गुण — तृतीय क्रमांक
इयत्ता सातवीमध्ये हार्दिका थोटम व रितिका राणे या दोन्ही विद्यार्थिनींना समान गुण मिळाल्याने त्यांना संयुक्त तृतीय क्रमांक देण्यात आला.
या परीक्षेसाठी बक्षिसांच्या स्वरूपात आर्थिक सहकार्य करणारे शिक्षणप्रेमी पालक श्री. रुपेश जाधव तसेच शाळा व्यवस्थापन समिती, वाडा मुळबांध यांचे केंद्राच्या वतीने केंद्रप्रमुख सौ. ब्रह्मदंडे मॅडम यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षण विभाग यांनी एकत्रितपणे काम केल्यास निश्चितच सकारात्मक परिणाम साधता येतात, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. परीक्षेत यश मिळविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.


Subscribe








