शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना दक्षतेच्या सूचना
सिंधुदुर्ग:शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी-विक्री पारदर्शक पद्धतीने होऊन त्यांची फसवणूक टाळावी, शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा आणि बाजारपेठेतील व्यवहारांमध्ये सुसूत्रता राहावी, यासाठी अधिसूचित शेतमालाची खरेदी-विक्री परवानाधारक व्यापाऱ्यांमार्फतच करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विनापरवाना शेतमाल खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी, तसेच बाजार समित्या आणि खाजगी बाजारांमध्ये शेतमालाची खरेदी जाहीर लिलावाद्वारेच होईल, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ अंतर्गत शेतमालाच्या विपणनासाठी नियंत्रित बाजार क्षेत्रासह खाजगी बाजार, थेट पणन, एकल बाजार परवाना आणि शेतकरी-ग्राहक बाजार अशा पर्यायी व्यवस्थांची तरतूद आहे. शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देणे, खरेदीदारांना एकत्रित व प्रतवारीनुसार शेतमाल मिळण्यास मदत करणे आणि दर्जेदार कृषी उत्पादनाला प्रोत्साहन देणे हा या व्यवस्थेचा उद्देश आहे.
शासनाच्या दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजीच्या राजपत्रानुसार अधिनियमातील कलम ६ च्या पोटकलम (२अ) मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार कलम ५-ड अंतर्गत परवाना किंवा बाजार समितीची अनुज्ञप्ती आवश्यक असलेल्या व्यवहारांसाठी संबंधित परवाना घेणे बंधनकारक आहे. तथापि, नियमनमुक्त केलेल्या शेतमालाच्या बाजार आवाराबाहेरील व्यवहारांवर बाजार समितीला बाजार शुल्क आकारता येणार नाही, अशी तरतूद करण्यात आली आहे.
परवानाधारक व्यापाऱ्यांनाच खरेदीची परवानगी
अधिसूचित शेतमालाची खरेदी करण्यासाठी संबंधित व्यापाऱ्याकडे सक्षम प्राधिकरणाने दिलेला वैध परवाना असणे आवश्यक आहे. यामध्ये खाजगी बाजार परवाना, थेट पणन परवाना, एकल बाजार परवाना किंवा संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेली व्यापारी अथवा खरेदीदार अनुज्ञप्ती यांचा समावेश आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवाराबाहेर फळे व भाजीपाला तसेच मसाल्याच्या पदार्थांमधील आले, लसूण, धणे आणि मिरची या शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे नियमनमुक्त व्यवहार करतानाही आवश्यक परवाना धारण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे या प्रकारचा व्यापार करू इच्छिणाऱ्या व्यक्ती, व्यापारी, संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी संबंधित कार्यालयाकडून थेट पणन परवाना किंवा एकल बाजार परवाना अथवा संबंधित बाजार समितीकडून खरेदीदार परवाना घेणे आवश्यक आहे.
विनापरवाना व्यापारावर कारवाई
काही व्यापारी वैध अनुज्ञप्ती नसतानाही बाजार आवाराबाहेर शेतकऱ्यांकडून फळे, भाजीपाला व अन्य शेतमाल खरेदी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आणि खाजगी बाजारांमध्ये जाहीर लिलावाशिवाय शेतमाल खरेदी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर संबंधित कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी अधिनियमातील कलम ४६ व ५२ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून विनापरवाना शेतमाल खरेदी-विक्रीला आळा घालावा. त्यांच्या कार्यक्षेत्रात अधिसूचित कृषी उत्पन्नाचा विनापरवाना व्यापार होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
जाहीर लिलाव आणि शेतकऱ्यांना पावती बंधनकारक
कृषी उत्पन्न बाजार समित्या व खाजगी बाजारांच्या आवारात विक्रीसाठी आणलेल्या शेतमालाची खरेदी जाहीर लिलावाद्वारेच होईल, याची संबंधित बाजार व्यवस्थापनाने खात्री करावी. तसेच शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेल्या शेतमालाचे नाव, वजन, बाजारभाव आणि शेतकऱ्याला देय असलेली रक्कम यांचा तपशील नमूद असलेली पावती देणे प्रत्येक व्यापाऱ्यास बंधनकारक आहे.
शेतकऱ्यांनीही आपला शेतमाल विक्री करताना संबंधित व्यापाऱ्याकडे वैध परवाना असल्याची खात्री करावी. परवानाधारक व्यापाऱ्यांमार्फतच व्यवहार करून शेतमालाच्या विक्रीची पावती घ्यावी, याबाबत कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी.
सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश
सर्व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी या परिपत्रकीय सूचनांची माहिती त्यांच्या अधिनस्त तालुका उपनिबंधक व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या तसेच जिल्ह्यातील खाजगी बाजारांना द्यावी. सर्व संबंधित यंत्रणांनी सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि शेतमालाच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Subscribe








