तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह;

रेवंडी, मालवण येथे मिठबांव येथील श्रीधर नरे यांचा मृतदेह आढळला. एका महिलेला ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले असून मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.

घटनास्थळी रक्ताचे डाग, मृत्यूचे गूढ कायम!

घातपाताची शक्यता? ; महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले

मालवण : तालुक्यातील रेवंडी येथील तांडेलवाडी सडा परिसरात देवगड तालुक्यातील मिठबांव येथील श्रीधर नरे या तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दरम्यान, घटनास्थळावरून निघून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका महिलेला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, तरुणाच्या मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रेवंडी तांडेलवाडी सडा येथे तरुणाचा मृतदेह आढळल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. यावेळी तेथून निघून जाणाऱ्या एका महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने ग्रामस्थांनी तिला थांबवून पोलिसांच्या स्वाधीन केले. संबंधित महिला मिठबांवच्या जवळील गावातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, मृत तरुणाशी तिचा काय संबंध आहे, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.

घटनास्थळी दुचाकी, दारूच्या बाटल्या आणि रक्ताचे डाग

घटनास्थळी दुचाकी, दारूच्या बाटल्या आणि रक्ताचे डाग आढळल्याची माहिती समोर येत आहे. या बाबींचा घटनेशी नेमका काय संबंध आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होईल. रक्ताचे डाग कशामुळे पडले आणि घटनास्थळी मृत्यूपूर्वी नेमकी कोणती परिस्थिती होती, याची पडताळणी होणे आवश्यक आहे.

मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

श्रीधर नरे याचा मृत्यू आत्महत्या आहे की यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत सध्या कोणताही निष्कर्ष काढता येत नाही. घटनास्थळावरील पुरावे, परिस्थितीची तपासणी आणि संबंधितांची चौकशी यांतूनच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार आहे.

या प्रकरणात पोलिसांच्या तपासातून कोणती माहिती समोर येते, तसेच ताब्यात घेतलेल्या महिलेच्या चौकशीतून काय स्पष्ट होते, याकडे रेवंडी, मिठबांव आणि परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!