अज्ञात दुचाकीस्वारावर कुडाळ पोलिसांत गुन्हा दाखल
कुडाळ : पावशी बेलनदीवाडी (ता. कुडाळ) येथे एका ५० वर्षीय महिलेला रस्त्याची विचारपूस करत बोलण्यात गुंतवून ठेवून, अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी (चेन) ओढून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी (१२ ऑक्टोबर) सायंकाळी पाऊणे सातच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पावशी बेलनदीवाडी येथील रहिवासी अनिता अशोक अंधारी (वय ५०) या सोमवारी सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी पावशी ते घावनळे जाणाऱ्या रस्त्यावर उभ्या होत्या. त्यावेळी एका अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांच्याजवळ गाडी थांबवून “घावनळेकडे जाणारा रस्ता कोणता?” अशी विचारपूस केली. अनिता अंधारी यांना बोलण्यात गुंतवून ठेवताच, भामट्याने अचानक त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळीवर झडप घातली. ओढाताढीत सोन्याची अर्धी साखळी तोडून चोरटा दुचाकीवरून वेगाने पसार झाला.
याप्रकरणी अनिता अंधारी यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०४(१) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सावर्डे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर गुन्ह्याची नोंद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माने यांनी केली असून, कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाडावे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस अज्ञात चोरट्याचा कसून शोध घेत आहेत.


Subscribe







