वेंगुर्लेत ७० लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत

घरकाम करणाऱ्या महिलेला ताब्यात

दाभोली-मोबारवाडीतील चोरीचा उलगडा

पडक्या घरातून ५१५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त

सिंधुदुर्गनगरी : वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली-मोबारवाडी येथे ज्येष्ठ महिलेच्या घरातून चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा शोध लावण्यात वेंगुर्ले पोलिसांना यश आले आहे. सुमारे ५१५ ग्रॅम वजनाचे आणि सध्याच्या बाजारभावानुसार अंदाजे ७० लाख रुपये किमतीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणात घरकाम करणाऱ्या २७ वर्षीय महिलेला ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांच्या माहितीनुसार चौकशीदरम्यान तिने चोरीची कबुली दिली आहे.

दाभोली-मोबारवाडी येथील सलोनी सुधीर लोलयेकर (वय ७२) या दोन महिन्यांपूर्वी पतीच्या उपचारासाठी मुंबईला गेल्या होत्या. या घाईत घरातील दागिन्यांच्या कपाटाला कुलूप लावले गेले नव्हते. तसेच तिजोरीच्या चाव्याही घरातच राहिल्या होत्या. २३ सप्टेंबर रोजी त्या घरी परतल्यानंतर सोन्याचे दागिने गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ अंतर्गत चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला.

घरातील व्यक्तींच्या हालचालींवर पोलिसांचे लक्ष

घरात नोकरांसह मोजक्याच व्यक्तींचा वावर असल्याने तपासादरम्यान पोलिसांनी घरात ये-जा करणाऱ्यांच्या हालचालींची माहिती घेतली. दागिने पेटीसह चोरीला गेल्याने ठोस पुरावे मिळवणे तपास पथकासाठी आव्हानात्मक ठरले. मात्र, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरूच ठेवला.

याच तपासादरम्यान लोलयेकर यांच्या घरी काम करणाऱ्या मार्टिना डुमिन लुद्रिक (वय २७, रा. दाभोली-मोबारवाडी) हिच्या हालचाली संशयास्पद असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. चोरीतील एका दागिन्याबाबत मिळालेल्या धाग्यावरून पोलिसांनी तिची चौकशी केली. त्यावेळी चोरीच्या घटनेतील तिच्या कथित सहभागाबाबत माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पडक्या घरातून दागिने जप्त

चोरी केलेले दागिने संशयित महिलेच्या राहत्या घराशेजारील एका पडक्या घरात ठेवण्यात आल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत तेथून सर्व दागिने जप्त केले. चोरीच्या वेळी दागिन्यांची अंदाजित किंमत जुन्या बाजारभावानुसार सुमारे २० लाख रुपये होती; सध्याच्या बाजारभावानुसार ती सुमारे ७० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे आणि वेंगुर्ले पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी उपस्थित होते.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले पोलिसांनी ही कारवाई केली. तपासात सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे चोरीस गेलेले दागिने हस्तगत करता आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

error: Content is protected !!