कणकवलीतील बेपत्ता महिला पोलीस हवालदाराचा मृतदेह जंगलात आढळला

दोन दिवसांपासून बेपत्ता महिला हवालदाराचा मृत्यू;

बिडवाडीच्या जंगलात आढळला मृतदेह

कणकवली : गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कणकवली पोलीस ठाण्यातील महिला हवालदार स्मिता माने यांचा मृतदेह रविवारी बिडवाडी-हुंबर्णे परिसरातील जंगलात आढळून आला. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

स्मिता माने या त्यांचे पती सचिन माने यांच्यासह कणकवली पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. सचिन माने हे पोलीस कॉन्स्टेबल आहेत. या दोघांची नुकतीच वैभववाडी पोलीस ठाण्यात बदली झाली होती. लवकरच ते नव्या ठिकाणी रुजू होणार होते.

शुक्रवारी सकाळी स्मिता माने घरी दिसून न आल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र, त्या सापडल्या नाहीत. त्यानंतर पती सचिन माने यांनी कणकवली पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता.

दरम्यान, रविवारी बिडवाडी-हुंबर्णे येथील जंगल परिसरात ग्रामस्थांना एका महिलेचा मृतदेह आढळला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान मृतदेह स्मिता माने यांचा असल्याची ओळख पटली.

त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!