घरातून दुर्गंधी आल्याने शेजाऱ्यांना आला संशय
केतन शिरोडकर / पिंगुळी
कुडाळ : पिंगुळी-गुढीपूर येथे भाड्याच्या घरात एकटे राहणारे पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त लिपिक विजय सोनू कळंबटे (वय ६४, मूळ गाव हातखांबा, रत्नागिरी) शनिवारी रात्री मृतावस्थेत आढळून आले. त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.विजय कळंबटे यांनी आंबडपाल येथील पाटबंधारे विभागात लिपिक म्हणून काम केले होते. निवृत्तीनंतर ते कुटुंबासह पिंगुळी-गुढीपूर येथे भाड्याच्या घरात वास्तव्यास होते. त्यांचे दोन्ही मुलगे नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात. पत्नीही एका मुलाकडे राहण्यासाठी गेल्याने कळंबटे सध्या घरात एकटेच राहत होते.शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास परिसरातील एक महिला फुले गोळा करण्यासाठी घराजवळ गेली होती. त्यावेळी घराचा दरवाजा बंद असल्याचे तिच्या निदर्शनास आले. घरातून दुर्गंधी येत असल्याने तिने आवाज देऊन पाहिले; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर तिने स्थानिक ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती कुडाळ पोलिसांना देण्यात आली.माहिती मिळताच कुडाळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गुरुदास पाडावे, सहायक पोलीस उपनिरीक्षक ममता जाधव आणि संदीप वराडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घराचा दरवाजा उघडून तपासणी केली असता, आत कळंबटे यांचा मृतदेह आढळून आला.पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या कामात स्थानिक ग्रामस्थांसह होमगार्ड संदेश गंगावणे, आनंद ठाकूर, प्रसन्ना गंगावणे आणि इतर नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केले.मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, या प्रकरणाचा पुढील तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.


Subscribe







